एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याची वेगळीच खेळी! थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा; राजकीय वर्तुळात चर्चा

छत्रपती संभाजीनगर : राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून, उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून विजयासाठी रणनीती आखली जात असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शिवसेनेचे माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देत प्रचारसभेत सहभाग घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून सतीश चव्हाण हे उमेदवार आहेत. मात्र, अब्दुल सत्तार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांच्या समर्थनार्थ सभा घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला डावलून सत्तार यांनी विरोधी आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार का केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर राजकीय पेच निर्माण झाल्याची चर्चा आहे.


महायुतीत सर्व काही आलबेल आहे का?
महायुतीमध्ये कोणताही वाद नसून सर्व मतभेद मिटले आहेत, असे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र, त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत सहभाग घेतल्याने महायुतीतील समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेलाही धक्का?
या प्रचारसभेला ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील उपस्थित होते. विशेष म्हणजे, ठाकरे गटाकडून दिलीप घुगे हे उमेदवार आहेत. अशा परिस्थितीत राहुल पाटील यांनी प्रतापसिंह पाटील यांच्या सभेला हजेरी लावल्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षातही या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे.
‘आम्ही सत्तार यांच्याशी चर्चा केली नव्हती’; शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया
या संपूर्ण प्रकरणावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या नेत्याने वैयक्तिक पातळीवर पाठिंबा दिला असू शकतो. आम्ही अब्दुल सत्तार यांच्याशी याबाबत कोणतीही चर्चा केली नव्हती. मात्र, प्रतापसिंह पाटील विजयी व्हावेत, असे त्यांना वाटत असावे, असे शिंदे यांनी म्हटले.
समोरच्या उमेदवाराबाबत पक्षात आणि मतदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याने सत्तार यांनी वेगळी भूमिका घेतली असावी, असेही त्यांनी सांगितले.
भाजप मित्रपक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप
शिंदे गटातील नेते नाराज आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी भाजपच्या राजकीय भूमिकेवर टीका केली. भाजपने यापूर्वीही मित्रपक्षांना हळूहळू कमकुवत केल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात भाजपचे दोन मित्रपक्ष असून, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये मित्रपक्षांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भावना मित्रपक्षांमध्ये निर्माण झाली असावी, असे शिंदे म्हणाले.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांची भूमिका, महायुतीतील समन्वय आणि पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या बदलत्या समीकरणांमुळे छत्रपती संभाजीनगरमधील निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
