चिंताजनक! पावसाळा संपताच पुण्यावर पाणीसंकट; पाणीकपात आणखी वाढणार? महत्त्वाची अपडेट समोर


पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा कमी झाल्याने शहरात पाणीकपात लागू करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी संपूर्ण पुण्याचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. अशातच आता पुण्यातील पाणीकपात आणखी वाढवण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी येत्या २८ ऑक्टोबरला महापालिकेत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना धरणातील पाणीसाठा जास्तीत जास्त दिवस पुरावा, यासाठी २० टक्के पाणीकपात करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे महापालिकेने यापूर्वीच शहरात १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा कमी असल्याने दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे.

पाणीकपात आणखी वाढवण्यावर चर्चा

शहरातील पाण्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता पाणीकपात आणखी वाढवण्याबाबत विचार सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. पाणीकपातीबाबत पुढील निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

२८ ऑक्टोबरला सर्वपक्षीय बैठक

शुक्रवारी झालेल्या पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरातील पाणीपुरवठ्याच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान पाणीकपातीमध्ये आणखी वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी करण्यात आली.

या बैठकीला पाटबंधारे विभागाचे अधिकारीही उपस्थित असावेत, अशा सूचना महापौर मंजूषा नागपुरे यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना दिल्या आहेत. त्यानुसार २८ ऑक्टोबरला बैठक होणार असून, या बैठकीत पुण्यातील पाणीकपातीबाबत नेमका काय निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

आधीच दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने, आता पाणीकपात आणखी वाढवली जाणार का, याबाबत पुणेकरांमध्ये उत्सुकता आणि चिंता आहे. २८ ऑक्टोबरच्या बैठकीनंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!