नाशिकमध्ये अजमेरी बेकरीवर FDA चा छापा; १५१ किलो केक अन् कप केक जप्त, नेमकं काय आढळलं?

नाशिक : सणासुदीच्या काळात मिठाई आणि बेकरी पदार्थांची मागणी वाढत असतानाच नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नाशिकमधील अजमेरी बेकरीवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १५१ किलो केक आणि कप केकचा साठा जप्त करण्यात आला असून, संबंधित बेकरीला व्यवसाय तातडीने बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

नाशिकमधील भारतनगर, वडाळा रोड परिसरात असलेल्या मे. अजमेरी बेकरीची अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तपासणी केली. यावेळी बेकरीकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच केक तयार करण्याच्या आणि अन्नपदार्थ साठवण्याच्या ठिकाणी अस्वच्छता असल्याचेही निदर्शनास आले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली.
१५१ किलो केक आणि कप केक जप्त


अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईदरम्यान १४३ किलो केक आणि आठ किलो कप केक असा एकूण १५१ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या जप्त साठ्याची किंमत सुमारे ४७ हजार ९९० रुपये असल्याचे वृत्त आहे. जप्त केलेला साठा नष्ट करण्यात आला असून, केकचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
‘फेस्टिव्हल ड्राइव्ह २०२६’ अंतर्गत कारवाई
सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून ‘फेस्टिव्हल ड्राइव्ह २०२६’ ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत अजमेरी बेकरीची तपासणी करण्यात आली. आवश्यक परवान्याचा अभाव आणि अस्वच्छता यांसारख्या त्रुटी आढळल्याने बेकरीला तातडीने व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील आणि संकेत येलमामे यांच्या पथकाने तपासणी केली. नाशिक विभागाचे सहआयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त (अन्न) व्ही. पी. धवड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, सणासुदीच्या काळात केक, मिठाई आणि अन्य खाद्यपदार्थ खरेदी करताना नागरिकांनी स्वच्छता, उत्पादनाची माहिती आणि अन्नसुरक्षेच्या नियमांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाकडून पुढील काळातही कारवाई केली जाणार आहे.
