पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज विजांच्या कडकडाटासह पाऊस, हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना इशारा

पुणे : राज्यात सध्या ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला असून, उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच आता हवामान विभागाने राज्यातील काही भागांसाठी वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणेकरांसाठीही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागांत आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आग्नेय अरबी समुद्र तसेच तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यातील हवामानात बदल झाला आहे. याचा परिणाम म्हणून आज, १७ ऑक्टोबर रोजी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि दक्षिण मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पावसाचा अंदाज


पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही भागांत आज मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र, पावसाची शक्यता असली तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमानातील चढ-उतार आणि दमट हवामानामुळे पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामानातील बदलांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे, रत्नागिरी, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दुसरीकडे, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत उष्णतेचा चटका आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पावसासोबतच उकाड्याचाही सामना करावा लागू शकतो.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
राज्यातील काही भागांत वादळी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना मोकळ्या जागेत थांबणे टाळावे. शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
एकीकडे ऑक्टोबर हीटमुळे वाढलेला उकाडा, तर दुसरीकडे वादळी पावसाची शक्यता यामुळे राज्यातील हवामानात दुहेरी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काळात तापमान आणि पावसाच्या स्थितीत काय बदल होतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
