वाढदिवसाला हार-तुरे नको, दुष्काळग्रस्तांना मदत करा! सुनेत्रा पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन


बारामती : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि हितचिंतकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.

वाढदिवसासाठी अनावश्यक खर्च न करता दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे. शुभेच्छा केवळ सत्कारातून नव्हे, तर प्रत्यक्ष सेवाकार्यातून व्यक्त कराव्यात, असा संदेशही त्यांनी दिला आहे.

सुनेत्रा पवार यांचा वाढदिवस रविवार, १८ ऑक्टोबर रोजी आहे. यानिमित्त त्यांची कर्मभूमी असलेल्या काटेवाडी येथे रविवारी सायंकाळी ६.३० वाजता कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ह.भ.प. अभिमन्यू कदम यांचे कीर्तन होणार आहे.

राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक सध्या पाणीटंचाईचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात खर्च करणे योग्य नसल्याची भूमिका सुनेत्रा पवार यांनी मांडली आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी हार, तुरे, पुष्पगुच्छ, फलकबाजी तसेच सत्कार यांसारख्या गोष्टी टाळाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.

वाढदिवसानिमित्त होणारा खर्च दुष्काळग्रस्त भागातील गरजू नागरिकांना पाणी, जनावरांसाठी चारा आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी वापरावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना मदत करणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचा संदेश या आवाहनातून देण्यात आला आहे.

दरम्यान, काटेवाडी येथे होणाऱ्या कीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून अध्यात्मासोबतच सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला भाविक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच दुष्काळग्रस्त नागरिकांना शक्य ती मदत करून सामाजिक संवेदनशीलतेचा परिचय द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!