एचसीएमटीआर व इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती; एचसीएमटीआर २४ मीटर तर इनररिंग रोडला ६५ मीटर भूसंपादन…

पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या २४ मीटर रुंदीच्या एचसीएमटीआर आणि ६५ मीटर रुंदीच्या इनर रिंग रोड प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या मार्गातील आवश्यक जमिनींची संयुक्त मोजणी ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संयुक्त आढावा बैठकीत या प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी, अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दोन्ही प्रकल्पांच्या मार्गातील जमिनींचे सीमांकन आणि संयुक्त मोजणी विहित मुदतीत पूर्ण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. राज्य शासनाच्या अखत्यारीतील आवश्यक जागांच्या हस्तांतरणासाठी शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेली पूरक कागदपत्रे आणि तांत्रिक अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही महानगरपालिकेला देण्यात आल्या.


पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोड हे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या प्रकल्पांमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील यांनी सादरीकरणाद्वारे स्पष्ट केले.
