नवरात्रीच्या उपवासाचे पदार्थ खाताय? पुणे-सांगलीत FDA ची धडक, लाखोंचा भेसळयुक्त माल जप्त


पुणे : नवरात्रोत्सवात उपवासाच्या पदार्थांना आणि मिठाईला मोठी मागणी असते. याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे आणि सांगली जिल्ह्यांत विशेष तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत सहा आस्थापनांची तपासणी करून एकूण ४ लाख ४६ हजार रुपयांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.

पुण्यातील बिबवेवाडी आणि मार्केट यार्ड परिसरात ही तपासणी करण्यात आली. बिबवेवाडी येथील ‘आशिष फूड्स’मधून २१० किलो बनाना वेफर्स, तर ‘रेड्डी स्वीट हाऊस’मधून ७५.६ किलो चकली जप्त करण्यात आली.

मार्केट यार्डातील ‘समीर सेल्स’ येथून १,२९८ किलो भगर आणि २,९९८ किलो साबुदाणा जप्त करण्यात आला. या साठ्याच्या गुणवत्तेबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातील विटा येथील ‘श्री बालाजी स्वीट मार्ट’मधून ६ किलो जिलेबी आणि म्हैसूर पाक, तर ‘सिरवी बंधू मिठाईवाले’ यांच्याकडून २७ किलो बुंदीचे लाडू आणि म्हैसूर पाक जप्त करण्यात आले. कवठेपिरान येथील ‘रुचिरा स्वीट्स’मधून ७२ किलो नारळ बर्फी आणि म्हैसूर पाकचा साठा ताब्यात घेण्यात आला.

FDA च्या माहितीनुसार, काही ठिकाणी खाद्यपदार्थांमध्ये घातक रंगांचा अतिवापर, निकृष्ट घटकांचा वापर आणि लेबलिंग नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. संबंधित पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पदार्थांच्या गुणवत्तेबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.

सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांचा दर्जा, पॅकिंग आणि लेबलवरील माहिती तपासावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!