आमिर खानच्या भाच्याला भारत सोडण्याची नोटीस? आंदोलनात सहभागी झाल्यानंतर इम्रान खानच्या अडचणी वाढल्या, २८ ऑक्टोबरची डेडलाइन!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर इम्रानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस देण्यात आल्याचे वृत्त आहे. या घडामोडीमुळे मनोरंजनविश्वासह राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, नोटिशीबाबत आणि इम्रानच्या नागरिकत्वाबाबत अधिकृत दुजोरा मिळणे आवश्यक आहे.

नेमकं आंदोलन काय होतं?
१० ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेत तसेच मतदार नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या नमुना क्रमांक ६ च्या अर्जात फेरफार झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. या आंदोलनात इम्रान खान सहभागी झाला होता. त्याच्यासोबत त्याची चुलत बहीण झेन मेरी खान आणि अभिनेत्री लेखा वॉशिंग्टन यादेखील उपस्थित होत्या.


मुंबई पोलिसांनी ६०० जणांना घेतले ताब्यात
आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी इम्रानसह तिघांना ताब्यात घेतले होते. वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, शहरातील विविध ठिकाणांहून सुमारे ६०० जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी जवळपास २०० जणांना ऑगस्ट क्रांती मैदानातून ताब्यात घेतल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
इम्रानच्या नागरिकत्वामुळे प्रकरणाला नवे वळण?
वृत्तांनुसार, इम्रानकडे भारतीय नागरिकत्व नसल्याचा दावा केला जात आहे. तो अमेरिकेचा नागरिक असल्याचेही म्हटले जाते. त्याच्या आंदोलनातील सहभागानंतर स्थलांतरविषयक कायद्यांतर्गत कारवाई सुरू झाल्याचे वृत्त आहे. मुंबई पोलिसांकडून त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश देणारी नोटीस देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याच्या नागरिकत्वाबाबत आणि नोटिशीच्या नेमक्या कायदेशीर आधाराबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
पोलिसांच्या वाहनातूनच इम्रानची पोस्ट
ताब्यात घेतल्यानंतर इम्रानने पोलिसांच्या वाहनातून समाजमाध्यमांवर पोस्ट केली होती. “बहुधा, मी एका ड्राइव्हवर चाललोय,” असे त्याने लिहिले होते. पोलिस त्याला वाहनात बसवत असताना एका पत्रकाराने आंदोलनाबाबत विचारले. त्यावर, “माझ्या कोणत्याही मागण्या नाहीत. मी कुठल्याही संघटनेचा भाग नाही,” असे त्याने सांगितले. तसेच, “मी काय केलंय? मला अशी धक्काबुक्की का केली जातेय?” असा सवाल करत त्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. आंदोलनात पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोपही काही आंदोलकांनी केला आहे.
आता २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याच्या नोटिशीचे वृत्त, इम्रानच्या नागरिकत्वाबाबतचे दावे आणि आंदोलनातील त्याचा सहभाग यामुळे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणावर संबंधित यंत्रणांकडून अधिकृत स्पष्टीकरण येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
