देशातील बदलत्या परिस्थितीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य; महायुतीत फूट पडण्याचे संकेत?


पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपमधील मतभेद आता चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पुण्यात स्वतंत्र भूमिका घेण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार की अपक्ष उमेदवाराच्या बाजूने उभे राहणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान, शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी देशातील परिस्थिती आणि जनतेच्या प्रश्नांवरून महायुतीला घरचा आहेर दिला आहे.

मंगेश चिवटे यांना उमेदवारी, नंतर माघार; नेमकं काय घडलं?

पुण्यात शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरुवातीला मंगेश चिवटे यांना अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर त्यांना माघार घेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे शिवसेना भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, या घडामोडींनंतर शिवसेनेच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, मुंबईतील नंदनवन या एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘आज अंतिम निर्णय होईल’

मंगेश चिवटे यांना आधी उमेदवारीचा एबी फॉर्म देऊन नंतर माघार घेण्यास सांगितल्याबाबत रवींद्र धंगेकर यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, “राजकारणात काही आराखडे असतात. काही वर-खाली दिसत असतं. पक्षाने त्यांचा निर्णय घेतला. आज अंतिम निर्णय होईल.”

सचिन सानप यांना पाठिंबा देण्याबाबतही अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे धंगेकर यांनी स्पष्ट केले. “मी पक्षाचा प्रमुख नाही. शिंदे साहेब निर्णय घेतील. साधक-बाधक चर्चा झाली आहे,” असे त्यांनी सांगितले.

‘देशात परिस्थिती चांगली वाटत नाही’; धंगेकरांचा घरचा आहेर

या बैठकीत केवळ निवडणुकीच्या रणनीतीवरच नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांवरही चर्चा झाल्याचे धंगेकर यांनी सांगितले. देशातील सध्याच्या परिस्थितीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, जनतेच्या मूलभूत प्रश्नांपेक्षा टेंडरच्या विषयांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीका केली.

“ग्राऊंडवर, लोकांमध्ये काय चर्चा आहे, त्यावर चर्चा झाली. देशात परिस्थिती चांगली वाटत नाही. देशामधलं चित्र बदलत चाललं आहे. कचऱ्याचं टेंडर, पाण्याचं टेंडर यावर चर्चा होते. जनतेची कामं सोडून टेंडरची कामं चालू आहेत,” असे धंगेकर म्हणाले.

तसेच, या परिस्थितीमुळे १०० नगरसेवकांचा स्वाभिमान दुखावला असेल, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारणावर नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

सचिन सानप यांना पाठिंबा देणार की नाही? उत्सुकता वाढली

सचिन सानप यांना पाठिंबा देण्याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसल्याचे धंगेकर यांनी पुन्हा स्पष्ट केले. कालची बैठक ही आढावा बैठक होती. त्यामध्ये आमदार, खासदार आणि नगरसेवकांनी निवडणूक कशा पद्धतीने लढवावी, याबाबत आपापली मते मांडली.

“शिंदेसाहेब छुपा वगैरे पाठिंबा देत नाहीत. जे काही असेल ते खुल्लमखुल्ला होईल, ओपन होईल. होय किंवा नाही,” असे धंगेकर यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे यांची शिवसेना नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपला पाठिंबा मिळणार की शिवसेना वेगळी भूमिका घेणार, याचे उत्तर अंतिम निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!