कोर्ट मॅरेजनंतर धर्मांतरासाठी दबाव? उच्चशिक्षित तरुणीला मारहाण; नागपुरात पतीसह 5 जणांविरोधात गुन्हा

नागपूर : नागपुरात विशेष विवाह कायद्यांतर्गत कोर्ट मॅरेज केल्यानंतर 26 वर्षीय आर्किटेक्ट तरुणीवर विशिष्ट धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप समोर आला आहे. याप्रकरणी तरुणीने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, नागपुरातील 26 वर्षीय आर्किटेक्ट तरुणीने 16 जानेवारी 2026 रोजी एका 26 वर्षीय इंजिनिअर तरुणासोबत विशेष विवाह कायद्यानुसार कोर्ट मॅरेज केले. लग्नापूर्वी तरुणीने आपण लग्नानंतर धर्मांतर करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. संबंधित तरुणानेही ही अट मान्य केली होती, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

मात्र, लग्नानंतर पतीकडून धर्मांतरासाठी दबाव टाकण्यास सुरुवात झाल्याचा आरोप तरुणीने केला आहे.


धर्मांतरास नकार दिल्यानंतर मारहाणीचा आरोप
तरुणीच्या तक्रारीनुसार, पतीसह सासरच्या मंडळींकडून तिला विशिष्ट धर्म स्वीकारण्यासाठी वारंवार दबाव आणण्यात आला. तिने धर्मांतरास नकार दिल्यानंतर अश्लील शिवीगाळ तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे.
तसेच, धर्मांतरास नकार दिल्यास किंवा या प्रकाराबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
नंदनवन पोलिसांत तक्रार दाखल
सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळाला कंटाळून अखेर तरुणीने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास नंदनवन पोलीस करत आहेत. तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.