तुकाराम मुंढेंचा महाराष्ट्रभर धडाका! अवघ्या 23 दिवसांत 3,068 दुकानांची तपासणी; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर खाद्यपदार्थांमधील भेसळ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
1 ते 23 सप्टेंबरदरम्यान अवघ्या 23 दिवसांत महाराष्ट्रातील 3,068 खाद्यपदार्थांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. यातील त्रुटी आढळलेल्या 1,506 दुकानांना सुधारणा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 248 दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, 12 परवाने रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान 455 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी 398 प्रकरणांचा निपटारा झाला आहे. या प्रकरणांत एकूण 53.60 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


भेसळ रोखण्यासाठी ‘फेस्टिव्हल एन्फोर्समेंट पोर्टल’
सणांच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मोदक, पेढे, खवा, पनीर, दूध, दही, तूप, खाद्यतेल आणि सुका मेवा यांसारख्या पदार्थांसोबतच उपवासाच्या काळात भगर, साबुदाणा आणि राजगिरा यांची मागणी वाढते. वाढत्या मागणीच्या काळात भेसळयुक्त किंवा असुरक्षित खाद्यपदार्थ बाजारात येण्याची शक्यता लक्षात घेऊन FDA ने ‘फेस्टिव्हल एन्फोर्समेंट पोर्टल’ सुरू केले आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून वर्षभरातील विविध सणांदरम्यान खाद्यपदार्थांची तपासणी, भेसळविरोधी कारवाई आणि सामूहिक भोजन कार्यक्रमांवर देखरेख ठेवली जाणार आहे. त्यामुळे कारवाई अधिक वेगाने करण्यासोबतच संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
मकर संक्रांतीपासून ख्रिसमसपर्यंत सणांची माहिती
‘फेस्टिव्हल एन्फोर्समेंट पोर्टल’वर मकर संक्रांतीपासून ख्रिसमसपर्यंत वर्षभरातील सणांची माहिती उपलब्ध असेल. या सणांचे तीन स्तर करण्यात आले आहेत. लेव्हल-1 मध्ये राज्यस्तरीय, लेव्हल-2 मध्ये प्रादेशिक आणि लेव्हल-3 मध्ये स्थानिक सणांचा समावेश असेल.
सणांच्या काळात आयोजित करण्यात येणारे भंडारे, अन्नछत्र आणि महाप्रसाद यांसारखे सामूहिक भोजन कार्यक्रमही या माध्यमातून ऑनलाइन पाहता येणार आहेत.
3,198 अर्ज; 383 ठिकाणी अधिकाऱ्यांची पाहणी
राज्यातील 90 झोनसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. भंडारा, अन्नछत्र आणि महाप्रसाद आयोजित करण्यासाठी पोर्टलवर आतापर्यंत 3,198 ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत.
खबरदारीचा उपाय म्हणून FDAच्या अधिकाऱ्यांनी 383 ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी भोजन तयार करण्याची जागा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कच्च्या मालाची गुणवत्ता, तयार अन्न साठवण्याची जागा आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची स्वच्छता याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
सणासुदीत खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर कडक नजर
सणांच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी FDAकडून तपासणी आणि कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणारे तसेच अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारे व्यावसायिक आता प्रशासनाच्या रडारवर आहेत.