गणेशोत्सवात अन्नपदार्थांवर एफडीएची करडी नजर; ५६ लाखांचा साठा जप्त, १० हजार केटरर्सना ३० टक्के फटका!


पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तपासणी मोहीम तीव्र केली आहे. पुण्यातील १२ आस्थापनांवर छापे टाकून तब्बल ५६ लाख रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर १० ते १५ सप्टेंबर या कालावधीत प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्याविरोधात १४ ठिकाणी कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत सुमारे २० लाख २६ हजार रुपयांचा साठा ताब्यात घेण्यात आला.

जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधित आस्थापनांवर पुढील कारवाई केली जाणार आहे. पुणे जिल्ह्याबरोबरच कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतही अन्नपदार्थांची तपासणी सुरू आहे. सणासुदीत खवा, मावा, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळीला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

याआधी बुधवार पेठ परिसरातही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत चार ट्रक पनीर आणि खवा जप्त केला होता. त्यानंतर आता पुन्हा मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्याने अन्नपदार्थ विक्रेते आणि केटरर्समध्येही सतर्कता वाढली आहे.

दरम्यान, प्रशासनाच्या कारवाईचा परिणाम पुण्यातील केटरिंग व्यवसायावर झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात सुमारे १० हजार केटरर्सना व्यवसायात ३० टक्क्यांपर्यंत फटका बसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे केटरर्सनी अन्नाची गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. एफडीएच्या कारवाईपासून बचाव करण्यासोबतच व्यवसायातील नियमांची माहिती मिळवण्यासाठी केटरर्स थेट तज्ज्ञांकडून प्रशिक्षण घेत आहेत.

या प्रशिक्षणात भेसळयुक्त दूध ओळखण्याची पद्धत, पनीर बनावट आहे की नाही हे तपासण्याचे मार्ग तसेच अन्नपदार्थांची योग्य हाताळणी याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. दुसरीकडे, ग्राहकांनीही सणासुदीत खाद्यपदार्थ खरेदी करताना पॅकेटवरील लेबल, उत्पादनाची तारीख आणि इतर आवश्यक माहिती तपासावी, असे अन्न व औषध प्रशासनाने आवाहन केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!