20 दिवसांनंतर जरांगेंनी उपोषण स्थगित केलं; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?


मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी अखेर 20 व्या दिवशी आपले उपोषण स्थगित केले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया दिली. जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याचा आनंद असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

“मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले, याचा मला आनंद आहे. आम्ही त्यांना आवाहन केले होते. त्यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य केल्या आहेत. एका मागणीसमोर कायदेशीर अडचण असल्यामुळे ती मान्य करता आली नाही. याबाबत त्यांना माहिती देण्यात आली,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सरकारकडून आश्वासनांची पूर्तता करण्याची ग्वाही

सरकारच्या उपसमितीने जरांगे पाटील यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. यासाठी आवश्यक बैठका घेऊन प्रशासकीय निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.

“सरकार सकारात्मक आहे. आमचे दरवाजे उघडे आहेत. मराठा समाजासाठी जेवढे निर्णय आम्ही घेतले, तेवढे निर्णय यापूर्वी कोणी घेतले नाहीत,” असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करत सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. या कालावधीत मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

गणेशोत्सवात आंदोलन संपल्याचा आनंद

“उपोषण संपले याचा मला आनंद आहे. राधाकृष्ण विखे-पाटील, प्रसाद लाड आणि एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. या सर्वांनी खूप मदत केली. सणाच्या काळात विघ्न न आणता हे आंदोलन संपले, याचा आनंद आहे,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध ठिकाणी सेवा उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

“महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची ज्या पद्धतीने आगेकूच सुरू आहे, त्यातून विकसित भारताचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल,” असे फडणवीस म्हणाले.

सेवा सप्ताहाच्या माध्यमातून महिनाभर विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!