गणपतीचे देखावे पाहायला जाताय? पुण्यात १८ ते २५ सप्टेंबरदरम्यान ‘हे’ महत्त्वाचे रस्ते बंद; वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग जाणून घ्या


पुणे : गणेशोत्सवातील मनमोहक देखावे आणि नयनरम्य रोषणाई पाहण्यासाठी पुण्यातील मध्यवर्ती भागात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक शाखेने वाहनचालकांसाठी महत्त्वाचे वाहतूक बदल जाहीर केले आहेत. १८ ते २५ सप्टेंबरदरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, अनेक मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

दररोज सायंकाळी ५ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत चारचाकी, दुचाकी आणि रिक्षांसह सर्व प्रकारच्या वाहनांना काही प्रमुख रस्त्यांवर प्रवेशबंदी राहणार आहे. मात्र, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या अत्यावश्यक वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद

बाजीराव रस्ता : पुरम चौक ते अप्पा बळवंत चौक या दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांनी पुरम चौकातून टिळक रस्त्याने पुढे जाऊन केळकर रस्त्याचा वापर करावा. तसेच टेलिफोन भवन ते पुरम चौक या मार्गावरील एकेरी वाहतूक तात्पुरती शिथिल करून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

लक्ष्मी रस्ता : हमजेखान चौक ते सेवासदन चौक आणि सेवासदन चौक ते टिळक चौक या दोन्ही मार्गांवर सायंकाळी ५ नंतर प्रवेश बंद राहणार आहे. वाहनचालकांनी डुल्या मारुती चौक किंवा दारूवाला पूल मार्गाचा वापर करावा.

शिवाजी रस्ता : गाडगीळ पुतळा ते रामेश्वर चौक या दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे.

स्वारगेटकडे जाणाऱ्यांसाठी ‘हे’ पर्यायी मार्ग

शिवाजीनगरकडून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.

मार्ग १ : स. गो. बर्वे चौक → जंगली महाराज रस्ता → टिळक चौक → टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्ता.

मार्ग २ : सिमला ऑफिस चौक → कामगार पुतळा चौक → शाहीर अमर शेख चौक → नेहरू रस्तामार्गे स्वारगेट.

तसेच रामेश्वर चौक ते जेधे चौक या मार्गावरील वाहतूकही वळवण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनचालकांना कुंभारवेस चौक, पवळे चौक, घोरपडे पेठ आणि शंकरशेठ रस्त्याने पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.

त्यामुळे गणेशोत्सवात मध्यवर्ती पुण्यात जाणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतूक बदलांची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!