दिशा सालियनच्या वडिलांकडून आदित्य ठाकरे, अनिल देशमुखांना कायदेशीर नोटीस; 500 कोटींची नुकसानभरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी


मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणात नवी घडामोड समोर आली आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते आमदार आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमधून दोन्ही नेत्यांनी सात दिवसांच्या आत बिनशर्त जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न केल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

500 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी

सतीश सालियन यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याकडून तब्बल 500 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच, मागितलेली बिनशर्त माफी प्रमुख वृत्तपत्रे, टीव्ही न्यूज चॅनेल्स आणि डिजिटल माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावी, अशी मागणीही नोटीसमध्ये करण्यात आल्याचे वृत्त आहे.

सतीश सालियन यांचा काय आरोप?

आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियनच्या न्यायासाठी सुरू असलेली आपली लढाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे चित्र उभे केल्याचा आरोप सतीश सालियन यांनी नोटीसमध्ये केला आहे. तसेच, दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने यापूर्वीच तपास करून क्लीन चिट दिल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र 2 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात सीबीआय तपासाचे निर्देश दिले.

उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या यापूर्वीच्या तपासातील विसंगतींची नोंद घेत सीबीआयला एफआयआर नोंदवून प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, कोणत्याही व्यक्तीविरोधात पुरेसा आधार मिळेपर्यंत त्याला आरोपी मानू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

अनिल देशमुखांच्या वक्तव्यावरही आक्षेप

अनिल देशमुख यांनी 23 मार्च 2025 रोजी हे प्रकरण आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे वक्तव्य केल्याचा दावा नोटीसमध्ये करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला आणि विश्वासार्हतेला धक्का पोहोचल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला आहे.

दोन्ही नेत्यांनी केलेली वक्तव्ये खोटी आणि बदनामीकारक असल्याचा दावा करत सतीश सालियन यांनी नोटीसमधून जाहीर माफीची मागणी केली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियनशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगत त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.

सात दिवसांची मुदत; अन्यथा कायदेशीर कारवाई

कायदेशीर नोटीसमधील मागण्या सात दिवसांत पूर्ण न केल्यास दिवाणी नुकसानभरपाईचा दावा तसेच मानहानीसंदर्भातील फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 356 अंतर्गत कारवाई करण्याचा हक्क राखून ठेवण्यात आल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपास आणि कायदेशीर घडामोडींकडे आता लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!