गणरायाच्या आगमनाच्या रात्रीच काळरात्र! मध्यरात्री फ्रिजचा भीषण स्फोट, घराला आग; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू


बेळगाव : गणरायाच्या आगमनाने घरात आनंदाचं वातावरण होतं… पूजा झाली, जेवण झालं आणि कुटुंबातील सदस्य झोपी गेले. मात्र मध्यरात्री अचानक झालेल्या एका मोठ्या स्फोटाने सगळं काही क्षणात उद्ध्वस्त केलं. घरातील फ्रिजचा स्फोट झाल्यानंतर भीषण आग भडकली आणि झोपलेल्या कुटुंबाला सावरण्याची संधीही मिळाली नाही. या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

कर्नाटकातील बेळगावच्या चव्हाट गल्ली परिसरात, मध्यवर्ती बसस्थानकाजवळ सोमवारी रात्री ही हृदयद्रावक घटना घडली. दमोने कुटुंबीयांनी गणेश चतुर्थीनिमित्त घरात गणरायाची स्थापना केली होती. रात्री जेवण झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य झोपले. त्यानंतर मध्यरात्री साधारण २ वाजून १५ मिनिटांनी अचानक मोठा आवाज झाला. फ्रिजमध्ये स्फोट झाल्यानंतर काही क्षणांतच घराला भीषण आग लागली आणि आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घराला वेढा घातला.

या दुर्घटनेत भारती दमोने (५०), शारदा दमोने (४५), गंगा दमोने (२५) आणि प्रिया दमोने (२४) यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर गजानन दमोने (६५) आणि रोशन दमोने (२१) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या शरीराचा सुमारे ६० टक्के भाग भाजल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यावेळी घराला आगीने पूर्णपणे वेढलं होतं. स्थानिक नागरिकांनी जीव धोक्यात घालून गजानन आणि रोशन यांना बाहेर काढलं. मात्र घरात अडकलेल्या अन्य चार जणांना वाचवता आलं नाही. स्फोटामुळे घराचा पत्र्याचा शेडही मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाला असून घरातील मौल्यवान वस्तू आणि साहित्य आगीत जळून खाक झालं.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार फ्रिजमध्ये बिघाड झाल्याने स्फोट झाला असावा, अशी शक्यता आहे. गणरायाच्या मूर्तीची सजावट करण्यासाठी लावलेल्या दिव्यांमुळे शॉर्टसर्किट झालं का, याचाही तपास केला जात आहे. मात्र आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही घटना मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शारदा या गजानन यांच्या पत्नी, भारती त्यांच्या बहिणी, तर गंगा आणि प्रिया या त्यांच्या मुली होत्या. रोशन हा त्यांचा मुलगा होता. गजानन हे सुतारकाम करत होते, तर कुटुंबातील इतर सदस्य घरांमध्ये आणि दुकानांमध्ये काम करून उदरनिर्वाह करत होते. गणेशोत्सवाच्या आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण चव्हाट गल्ली परिसरावर शोककळा पसरली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!