लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! गौरी आगमनाच्या मुहूर्तावर खात्यात जमा होणार 1500 रुपये?


पुणे : लाडक्या गणरायाचे घरोघरी जल्लोषात आगमन झाले असून संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण आहे. आता गुरुवारी ज्येष्ठा गौरींचेही आगमन होणार आहे. सण-उत्सवाच्या या आनंदात राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.

खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया 16 किंवा 17 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

किती महिलांना मिळणार लाभ?

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत राज्यातील तब्बल 1 कोटी 66 लाख पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. यापूर्वी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता.

आता गणेशोत्सव आणि गौरी आगमनाच्या मंगल पर्वावर ऑगस्ट महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना गौरी आगमनाच्या निमित्ताने सरकारकडून आर्थिक गिफ्ट मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकत्र 3,000 रुपये मिळणार?

जर ऑगस्ट महिन्याचा हप्ता 20 सप्टेंबरपर्यंत जमा झाला नाही, तर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे वितरित केले जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट 3,000 रुपये जमा होऊ शकतात.

मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र देण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा किंवा शासन निर्णय जारी करण्यात आलेला नाही.

त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता गौरी आगमनापूर्वीच खात्यात जमा होणार की दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये एकत्र मिळणार, याकडे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!