दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; अखेर CBI कडून मोठी कारवाई

मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात सीबीआयने सोमवारी एफआयआर दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सीबीआयला तपासाचे आदेश दिले होते.
त्यानंतर सीबीआयने सामूहिक अत्याचार, हत्या आणि कट रचल्याच्या आरोपांप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. दिशा सालियन यांच्या वडिलांनी दिलेल्या जबाबात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह रिया चक्रवर्ती, अनिल देशमुख, परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या नावांचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता पुन्हा राजकीय रंग आला आहे.

मुंबई पोलिसांच्या तपासावर कोर्टाचे सवाल
दिशा सालियन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावरही प्रश्न उपस्थित केले होते. सहा वर्षे उलटूनही या प्रकरणात एफआयआर दाखल न झाल्याबद्दल न्यायालयाने सवाल उपस्थित केले होते.


मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा दोन वेळा तपास केला होता. या तपासानंतर दिशा सालियन यांचा मृत्यू अपघाती असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
दिशा सालियन यांचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका 14 मजली इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांनी, 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी मृत्यू झाला.
दिशा सालियन यांच्या मृत्यूनंतर सुरुवातीला पोलिसांनी तपास केला. काही महिन्यांच्या तपासानंतर प्रकरण बंद करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत विविध दावे करण्यात आले. त्यामुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आले.
आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणात एफआयआर दाखल केल्याने पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.