OYO हॉटेलमध्ये गेलात तर सावधान! बावनकुळेंनी नांगरे पाटलांच्या नियमावलीचं केलं कौतुक; पोलिसांना दिला फ्री हँड

सोलापूर : सध्या शहरातील कॉलेज परिसर किंवा पर्यटनस्थळांच्या भागात हॉटेल आणि लॉज असणे ही सामान्य बाब झाली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून नागपूर शहरात OYO हॉटेल्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी OYO हॉटेल्ससाठी कडक नियमावली लागू केली आहे. आता प्रत्येक OYO हॉटेलवर पोलिसांची नजर असणार आहे.

जिल्ह्याची सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती जपली पाहिजे, असे म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले आहे.


नागपूरमध्ये मागील काही दिवसांत OYO हॉटेल्सची वाढलेली संख्या आणि या हॉटेल्समध्ये घडलेल्या काही घटनांची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी OYO हॉटेल्ससाठी कडक नियमावली लागू केली. या मुद्द्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कडक भूमिका मांडली आहे.
‘OYO चालकांना रेकॉर्ड ठेवावे लागणार, सगळं दिसणार’
OYO नावाच्या हॉटेल्समध्ये वेगळ्या प्रकारचे लोक येत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हॉटेलच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत माझी पोलीस आयुक्तांसोबत चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याची माहिती दिली. त्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांनी चांगली नियमावली तयार केल्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
OYO हॉटेल्सवर पोलिसांची कडक नजर
“प्रत्येक दोन हॉटेलनंतर एका OYOचा बोर्ड लागलेला आहे. आता हे कशासाठी आहे, याची तपासणी केली पाहिजे. त्यासाठी पोलिसांची कडक नजर या हॉटेल्सवर असणार आहे. जिल्ह्याची सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती जपली पाहिजे. पोलीस आयुक्तांनी यासाठी कडक पावले उचलली आहेत,” असे म्हणत बावनकुळे यांनी नांगरे पाटील यांच्या निर्णयाचे कौतुक केले.
९० दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज ठेवणे बंधनकारक
आता OYO हॉटेलमध्ये प्रवेश करताना कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. प्रत्येक हॉटेल चालकाला येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांचा संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागेल. तसेच ९० दिवसांचे सीसीटीव्ही चित्रिकरण जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.