पुण्याच्या मोनालीचा व्हिडिओ पाहून संपर्क साधला, पण पुढे धक्कादायक प्रकार घडला; अखेर पोलिसांकडे धाव

पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून अंधश्रद्धेचे जाळे पसरवून सर्वसामान्यांना लुटणाऱ्या एका भोंदू महिलेचा पुण्यात पर्दाफाश झाला आहे. कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवत एका बांधकाम ठेकेदाराकडून तब्बल ४५ हजार रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मृत्यूची भीती दाखवून पैसे उकळल्याप्रकरणी ‘गुरुवर्य मोनालीआई विधाते’ हिच्यासह तिच्या साथीदारांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.
या प्रकरणी मोनाली विधाते, कृष्णा विधाते (दोघे रा. सुखसागरनगर, कात्रज), तिचा भाऊ मयूर, अशोक बनकर आणि मंजू कौर या पाच जणांविरुद्ध संबंधित गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावरील रील पाहिली अन् संपर्क साधला
सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील एका बांधकाम ठेकेदाराने बिबवेवाडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारदाराने सोशल मीडियावर ‘गुरुवर्य मोनालीआई विधाते’ नावाची व्हिडिओ क्लिप पाहिली होती. या व्हिडिओवर विश्वास ठेवून त्यांनी डिसेंबर २०२५ मध्ये मोनाली विधाते हिच्याशी संपर्क साधला.


यानंतर संबंधित टोळीने ठेकेदाराच्या कौटुंबिक समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच, “तुमच्या घरावर मोठे संकट आहे, कोणाचा तरी मृत्यू होईल,” अशी भीती दाखवून त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने ४५ हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.
पैसे परत मागताच धमकी
पैसे दिल्यानंतरही समस्या दूर न झाल्याने तक्रारदाराने आपले पैसे परत मागितले. त्यावेळी आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत आरोपींविरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
आणखी नागरिकांना गंडा घातल्याचा संशय
मोनाली विधाते आणि तिच्या साथीदारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यासह आसपासच्या जिल्ह्यांतील आणखी नागरिकांना अशाच प्रकारे जाळ्यात ओढून पैसे उकळले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या टोळीने आणखी किती जणांना फसवले आहे, याचा शोध घेतला जात आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.