स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची तयारी सुरू; वर्षभरात 12 हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती, बँकेत सध्या किती कर्मचारी?

नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मोठी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या एसबीआयमध्ये आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 11 हजार ते 12 हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे नियोजन आहे. बँकेचे चेअरमन सी.एस. शेट्टी यांनी याबाबत माहिती दिली आहे. या भरतीमध्ये प्रामुख्याने क्लेरिकल आणि ऑफिसर केडरमध्ये नियुक्त्या होणार आहेत. मात्र, निवृत्ती आणि बँकेच्या प्रत्यक्ष गरजेनुसार अंतिम संख्या कमी-अधिक होऊ शकते. वर्षअखेरीस जवळपास 12 हजार भरती पूर्ण करण्याची अपेक्षा आहे.
मागील वर्षी 25 हजारांहून अधिक भरती

एसबीआयने मागील आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची भरती केली होती. 2025-26 मध्ये बँकेने एकूण 25,633 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. यामध्ये 4,640 अधिकारी, 19,340 असोसिएट्स आणि 1,653 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मागील वर्षी सुमारे 1,500 स्पेशालिस्ट आयटी ऑफिसर्सचीही भरती करण्यात आली होती. मात्र, यंदा आयटी विभागात एवढ्या मोठ्या संख्येने भरतीची गरज नसल्याचे सी.एस. शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाच्या भरतीचा मुख्य भर क्लेरिकल आणि ऑफिसर पदांवर राहणार आहे.


SBIमध्ये सध्या किती कर्मचारी?
मार्च 2026 अखेर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2.45 लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत होते. एवढ्या मोठ्या मनुष्यबळासोबतही बँकेकडून नव्या नियुक्त्यांची तयारी सुरू आहे. निवृत्त होणारे कर्मचारी, वाढते कामकाज आणि विविध भागांमध्ये बँकेचा विस्तार यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची गरज भासत आहे.
200 ते 250 नव्या शाखांची भर पडणार
एसबीआयकडून केवळ कर्मचारीसंख्या वाढवली जाणार नाही, तर शाखांचं जाळंही विस्तारलं जाणार आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये बँकेच्या शाखांची संख्या निव्वळ 200 ते 250 ने वाढवण्याचे नियोजन आहे. नव्या वसाहती विकसित होत असलेल्या भागांमध्ये तसेच व्यावसायिकदृष्ट्या सक्रिय जिल्ह्यांमध्ये बँकेची उपस्थिती वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर काही विद्यमान शाखांची पुनर्रचनाही केली जाणार आहे.
NSEमधील 1 टक्के हिस्सा विकण्याची तयारी
दरम्यान, एसबीआय आणि त्याची उपकंपनी एसबीआय कॅपिटल मार्केट्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात NSEमधील एकत्रित 1 टक्क्यापर्यंतचा हिस्सा विकण्याच्या तयारीत आहेत. प्रस्तावित 30 हजार कोटी रुपयांच्या NSE आयपीओमध्ये एसबीआयकडून 0.65 टक्के आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्सकडून 0.35 टक्के हिस्सा विकला जाणार आहे. इतर भागधारकांनीही हिस्सा विकल्यास एसबीआय समूहाची विक्री 1 टक्क्यांपेक्षा कमी असू शकते.
सध्या एसबीआयकडे NSEमध्ये 3.23 टक्के, तर एसबीआय कॅपिटल मार्केट्सकडे 4.33 टक्के हिस्सेदारी आहे. NSEचा प्रस्तावित आयपीओ भारतातील सर्वात मोठ्या आयपीओपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.
म्हणजेच, 12 हजार नव्या नोकऱ्या, 250 पर्यंत नव्या शाखा आणि NSEमधील हिस्सा विक्री, अशा तीन आघाड्यांवर एसबीआयकडून मोठ्या हालचाली सुरू आहेत. मात्र, भरतीची अंतिम पदसंख्या आणि अर्जाची प्रक्रिया बँकेकडून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.