डीजे-डॉल्बीवर बंदी नाही, पण आवाजाची मर्यादा ओलांडली तर थेट साऊंड सिस्टीम जप्त! सातारा SPचा मंडळांना मोठा इशारा

सातारा : गणेशोत्सव जवळ येत असताना डीजे आणि डॉल्बीच्या वापरावरून सुरू असलेल्या चर्चेला साताऱ्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. डीजे किंवा डॉल्बीवर सरसकट बंदी घालता येणार नाही; मात्र आवाजाची निर्धारित मर्यादा ओलांडल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे यंदाच्या उत्सवात डीजे बंदीपेक्षा ध्वनीमर्यादेचा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
पिंगळे यांनी डॉल्बी ही ध्वनी तंत्रज्ञानाची प्रणाली असल्याचं स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयाने डॉल्बीवर बंदी घालण्याचे निर्देश दिलेले नसून, माणसाच्या आरोग्याला त्रास होईल इतका आवाज होऊ नये, यासाठी मर्यादा निश्चित केल्या आहेत. तर डीजे म्हणजे डिस्को जॉकी असून त्याचं काम संगीत किंवा गाणी बदलणं आहे. त्यामुळे ‘डीजे’ या नावावरच बंदी घालण्याचा प्रश्न नसल्याचं त्यांनी सांगितलं.

मात्र, साऊंड सिस्टीम विक्रेत्यांकडून पोलिसांची नजर चुकवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचं पिंगळे यांनी निदर्शनास आणून दिलं. प्लाझ्मा आणि मिड-प्रेशर बेस साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून कमी स्पीकरमध्ये मोठ्या आवाजाची क्षमता निर्माण केली जात आहे. बाहेरून दोन स्पीकर दिसत असले तरी त्यांचा आवाज दहा स्पीकरइतका असू शकतो. अशा प्रकारे ध्वनीमर्यादा चुकवण्यासाठी ऑगमेंटेड साहित्य किंवा अतिरिक्त उपकरणांचा वापर आढळल्यास ते जप्त करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.


मोठ्या आवाजाचा परिणाम तरुणांच्या कानांवरही होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींना अशा ठिकाणी बसवून पाहा, म्हणजे मोठ्या आवाजाचा त्रास किती होतो हे लक्षात येईल, अशा शब्दांत त्यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना टोला लगावला.
दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनीही डीजे-डॉल्बीबाबत भूमिका स्पष्ट केली. डीजे किंवा डॉल्बीच्या वापरावर पूर्ण बंदी नसून डेसिबलची निर्धारित मर्यादा पाळावी लागेल, असं त्यांनी सांगितलं. कराडमध्ये गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
याचवेळी गणेश मंडळांच्या महाप्रसादाबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. महाप्रसादासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचं शर्मा यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे डीजे-डॉल्बीचा आवाज, ध्वनिमर्यादा आणि पोलिसांची कारवाई याबाबत गणेश मंडळांमध्ये उत्सुकता असतानाच, महाप्रसादाच्या परवानगीबाबतही महत्त्वाचा संभ्रम दूर झाला आहे.