जर्मनीत लाखोंचं पॅकेज, आठ दिवसांपूर्वीच गावी आला; पुण्यात IT इंजिनिअरच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

पुणे : परदेशात उत्तम नोकरी, चांगलं करिअर आणि कुटुंबासोबत सुखी आयुष्य… सगळं काही सुरळीत सुरू असताना पुण्यातील एका तरुण आयटी अभियंत्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. जर्मनीत नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेले अमोल सुखराज गाढवे हे अवघ्या आठ दिवसांपूर्वीच मायदेशी, आपल्या मूळ गावी कुंजीरवाडी येथे परतले होते. मात्र, त्यानंतर घडलेल्या घटनेने गाढवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अमोल गाढवे हे गेल्या काही वर्षांपासून जर्मनीमध्ये आयटी क्षेत्रात कार्यरत होते. लाखो रुपयांचे पॅकेज आणि परदेशातील नोकरीमुळे त्यांनी आपल्या करिअरमध्ये चांगले यश मिळवले होते. त्यांचे कुटुंबीय आणि दोन मुलेही आहेत. काही दिवसांच्या सुट्टीसाठी किंवा कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते जर्मनीहून पुण्याजवळील कुंजीरवाडी येथे आले होते.

घरातील वादामुळे मानसिक तणाव वाढला


मिळालेल्या माहितीनुसार, अमोल गाढवे यांच्या घरी मागील काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. घरातील या वादामुळे ते मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.
उच्चशिक्षित, परदेशात चांगल्या पदावर कार्यरत आणि आयुष्यात स्थिरावलेल्या तरुणाचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने नातेवाईक आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, ते जर्मनीहून भारतात परतल्यानंतर अवघे आठ दिवसच झाले होते.
दोन मुलांवर वडिलांचे छत्र हरपले
अमोल यांच्या पश्चात कुटुंबीय आणि दोन मुले आहेत. त्यांच्या अकाली निधनामुळे मुलांच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले आहे. या घटनेनंतर गाढवे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून कुटुंबाचे सांत्वन केले जात आहे.
कुंजीरवाडीत शोककळा; सकाळी अंत्यसंस्कार
अमोल गाढवे यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी गावात शोककळा पसरली. त्यांचे नातेवाईक, मित्र आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने अंत्यविधीसाठी उपस्थित होते.
६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता कुंजीरवाडी येथे शोकाकुल वातावरणात अमोल गाढवे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परदेशात यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या तरुणाचा अचानक झालेला मृत्यू अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे.
दरम्यान, कौटुंबिक वादातून निर्माण होणारा मानसिक ताण दुर्लक्षित न करण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे. मानसिक तणाव जाणवत असल्यास कुटुंबीय, मित्र किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे.