थेऊरमध्ये भरधाव स्कॉर्पिओची कारला जोरदार धडक; महिलेचा जागीच मृत्यू, १८ वर्षीय मुलगी गंभीर; अपघातानंतर स्कॉर्पिओ घटनास्थळीच सोडून चालक पसार…

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील थेऊर-लोणीकंद मार्गावर भरधाव स्कॉर्पिओने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील ४४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिची १८ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. धडक दिल्यानंतर स्कॉर्पिओ घटनास्थळीच सोडून चालक पसार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ४) सकाळी सव्वाआठच्या सुमारास थेऊर येथील स्मशानभूमीजवळ घडली.
सिमरोट नाईक (वय ४४, रा. तळोजा, डोंबिवली पूर्व, कल्याण-ठाणे) असे मृत महिलेचे नाव आहे. तर पल्लवी नाईक (वय १८) ही गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी नितीन साईनाथ गांगुर्डे (वय ३४, रा. नाशिक) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, स्कॉर्पिओच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गांगुर्डे हे सिमरोट नाईक आणि तिची मुलगी पल्लवी यांना कारमधून घेऊन कल्याणहून बंगळुरूकडे निघाले होते. वाटेत थेऊर येथील गणपतीचे दर्शन घेण्याचे नियोजन असल्याने ते वाघोलीमार्गे थेऊरच्या दिशेने येत होते.


शुक्रवारी सकाळी कोलवडी-थेऊर मार्गावर स्मशानभूमीजवळ समोरून पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ भरधाव वेगाने आली. स्कॉर्पिओ आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच गांगुर्डे यांनी कार उजव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्कॉर्पिओने कारच्या डाव्या बाजूला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या नदीलगतच्या लोखंडी संरक्षण कठड्यावर जाऊन आदळली.
या अपघातात कारच्या डाव्या बाजूला बसलेल्या सिमरोट नाईक आणि मागील सीटवर असलेल्या पल्लवी नाईक यांना गंभीर दुखापत झाली. गांगुर्डे यांच्या डोक्यालाही दुखापत झाली. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, धडक देणारा स्कॉर्पिओ चालक वाहन घटनास्थळीच सोडून कोणतीही मदत न करता पसार झाला.
जखमींना नागरिकांनी खासगी वाहनातून वाघोली येथील आयएमएचएस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी सिमरोट नाईक यांना सकाळी साडेआठच्या सुमारास मृत घोषित केले. पल्लवी नाईक हिला गंभीर अवस्थेत अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, ती बेशुद्ध असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
रूग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना एमएलसीची माहिती मिळाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन गांगुर्डे यांचा जबाब नोंदविला. त्यांच्या तक्रारीवरून स्कॉर्पिओ क्रमांक एमएच ४५ सीक्यू ०२२८ वरील अज्ञात चालकाविरोधात भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर स्कॉर्पिओ घटनास्थळी सोडून पसार झालेल्या चालकाचा लोणी काळभोर पोलीस शोध घेत आहेत.