शरद पवारांना एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का; 2 बड्या नेत्यांसह 11 नगरसेवक शिंदे गटात, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाकरे गटातील दिग्गज नेत्यांना आपल्या गटात आणण्यासाठी हालचाली सुरू असतानाच आता शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
भुसावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील दोन माजी नगराध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी आणि माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत भुसावळ नगरपालिकेतील ११ नगरसेवकांनीही शिंदे गटाची वाट धरली आहे.

या राजकीय प्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. भुसावळ नगरपालिकेतील सत्तेचे समीकरण बदलण्यासाठी गायत्री भंगाळे यांचा शिवसेनेतील प्रवेश महत्त्वाचा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


२०२५ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत गायत्री भंगाळे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करत नगराध्यक्षपद मिळवले होते. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र समितीने अवैध ठरवल्यानंतर त्यांना नगराध्यक्षपदासाठी अपात्र ठरवण्यात आले होते.
शरद पवार गटाच्या ११ नगरसेवकांची शिंदे गटात एन्ट्री
भुसावळ नगरपालिकेतील शरद पवार गटाच्या ११ नगरसेवकांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गायत्री भंगाळे आणि अनिल चौधरी यांच्या पुढाकाराने गटनेते सचिन संतोष चौधरी, इक्बाल दिलनवाज शेख, उल्हास भीमराव पगारे, सुभद्रा गुंजाळ, अमीन कुरेशी, शेख नसीब शेख नदीम, सचिन भास्कर पाटील, अकील नादर पिंजारी, शबाना बी. सिकंदर खान, पुष्पा कैलास चौधरी आणि सुनीता कृषधनकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
यांच्यासोबत सिकंदर खान, नदीम सरकार, इसाक बागबान, ओमप्रकाश झा, गिरीश पारधी, महेंद्र चौधरी, नरसिंह तायडे, अनिकेत झा, नचिकेत मंदवाळे, आरिफ खान, आरिफ शेख यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
या मोठ्या पक्षप्रवेशामुळे भुसावळमधील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून, आगामी काळात आणखी काही नेते आणि पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.