डीजेविरोधात बोलणं पडलं महागात! विद्यानंद बापटांवर कॅमेऱ्यासमोर हल्ला; ‘घटं भिन्द्यात्…’ म्हणत हल्लेखोराला सुनावलं

पुणे : पुण्यात गणेशोत्सवातील डीजे आणि कर्णकर्कश आवाजाविरोधात भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माध्यमांशी संवाद साधत असतानाच एका व्यक्तीने अचानक बापट यांच्यावर हल्ला केला. विशेष म्हणजे, हा प्रकार कॅमेऱ्यासमोर घडल्याने घटनेचे चित्रणही उपलब्ध असल्याचे बापट यांनी सांगितले आहे.
गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे, ढोल-ताशे आणि मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात बापट गेल्या काही दिवसांपासून आवाज उठवत आहेत. सार्वजनिक उत्सवांना आपला विरोध नसून, उत्सव साजरा करताना ध्वनीप्रदूषण होऊ नये आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी त्यांची भूमिका आहे. यापूर्वी त्यांनी पुणे महापालिकेच्या सभेतही डीजेच्या आवाजाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि काही राजकीय व्यक्तींनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला होता. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना बंदोबस्तात बाहेर काढले होते.

हल्ल्यानंतर बापटांचा संताप; ‘घटं भिन्द्यात्…’चा पुन्हा उल्लेख


मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांनी हल्लेखोरावर तीव्र शब्दांत टीका केली. आपण माध्यमांशी बोलत असताना अचानक एक व्यक्ती आली आणि तिने हल्ला केला. आपण सशस्त्र नसल्याचे आणि त्या ठिकाणी पोलीस नसल्याचे पाहून हल्ला करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या घटनेचे चित्रण पोलिसांनी तपासून हल्लेखोरावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी बापट यांनी चर्चेत आलेला ‘घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्’ हा श्लोक पुन्हा उच्चारला. मडके फोडावे, वस्त्र फाडावे आणि गाढवावर बसावे; मात्र कोणत्याही प्रकारे प्रसिद्धी मिळवावी, असा या श्लोकाचा अर्थ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हल्लेखोराने सवंग प्रसिद्धीसाठी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोपही त्यांनी केला.
कोण आहेत विद्यानंद बापट?
विद्यानंद बापट हे ३७ वर्षीय असून मूळचे रत्नागिरीचे रहिवासी आहेत. मागील आठ वर्षांपासून ते पुण्यातील नारायण पेठ परिसरात राहत आहेत. मुंबई विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून ते बीपीओ क्षेत्रात काम करतात. त्यांचे बहुतांश काम घरूनच चालते. पुरोगामी संघटनांच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्येही ते सहभागी होत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, बापट यांच्या डीजेविरोधातील भूमिकेला आता व्यापक चर्चा मिळाली आहे. त्यांच्या श्लोकामुळे सोशल मीडियावरही मोठी उत्सुकता निर्माण झाली असून त्यावर अनेक ध्वनिचित्रफिती प्रसारित होत आहेत.
डीजेच्या आवाजाविरोधात आणखी एक तक्रार
दरम्यान, पुण्यातील ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा केवळ बापट यांच्या भूमिकेपुरता मर्यादित राहिलेला नाही. डेक्कन जिमखाना परिसरातील रहिवासी शरद केळकर यांनीही गणेशोत्सवातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.
त्यामुळे एकीकडे डीजेच्या आवाजावरून सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू असतानाच, बापट यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेने पुण्यातील वातावरण आणखी तापले आहे. डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला होणे योग्य आहे का, तसेच या हल्ल्यामागे नेमके कारण काय आहे, याचा तपास आता पोलिसांकडून होणे अपेक्षित आहे.