तपासणीच्या नावाखाली डॉक्टरनं तरुणीला वेगवेगळ्या खोल्यांत नेलं; अश्लील कृत्य केलं अन्.. अकोल्यातील डॉक्टरच्या कारनाम्याने महाराष्ट्र हादरला

अकोला : अकोल्यातील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४६ वर्षीय नामांकित त्वचारोगतज्ज्ञाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नागपूर येथील एक युवती २९ ऑगस्ट रोजी चेहऱ्यावरील केसांवरील उपचारासाठी संबंधित डॉक्टरच्या रामनगरातील दवाखान्यात गेली होती. उपचार आणि तपासणीच्या बहाण्याने डॉक्टरने तिला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेऊन अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप युवतीने तक्रारीत केला आहे.
तक्रारीनुसार, सुरुवातीला डॉक्टरने युवतीची तपासणी केली. त्यानंतर इतर रुग्ण बाहेर गेल्यावर तिला स्वतंत्र चेंबरमध्ये बोलावण्यात आल्याचा आरोप आहे. उपचाराच्या नावाखाली तिच्याशी गैरवर्तन केल्याचे युवतीने पोलिसांना सांगितले. एवढेच नव्हे, तर औषध देण्याच्या बहाण्याने वैद्यकीय दुकानातही लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घडलेला प्रकार युवतीने आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांसह थेट सिव्हिल लाइन्स पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत डॉक्टरविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम ७४ आणि ७५(१) अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ४६ वर्षीय डॉक्टरला ताब्यात घेत अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


दरम्यान, या घटनेची माहिती समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकर यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी आरोपी डॉक्टरला गाठून ‘शिवसेना स्टाईल’ चोप दिल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.
विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टरविरोधात यापूर्वीही अशाच प्रकारच्या गैरवर्तनाचा आरोप झाल्याची माहिती समोर आली आहे. २ मे २०२४ रोजी एका महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
या नव्या प्रकरणामुळे अकोल्यातील वैद्यकीय क्षेत्रासह रामनगर परिसरात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, सध्याच्या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून संबंधित व्यक्तींचे जबाब, उपलब्ध तांत्रिक माहिती आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. आरोप सिद्ध होईपर्यंत संबंधित डॉक्टरला दोषी ठरवता येणार नाही, हेही कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचे आहे.