महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा दणका! CNG-PNG महागले, नवे दर लागू

मुंबई : महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना महिन्याच्या सुरुवातीलाच आणखी एक झटका बसला आहे. मुंबईत CNG आणि PNGच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) CNGच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ केली असून, घरगुती PNGच्या दरातही प्रति SCM १ रुपयाने वाढ करण्यात आली आहे.
नवीन दर १ सप्टेंबर २०२६ पासून लागू झाले आहेत. दरवाढीनंतर मुंबईत CNGचा दर आता प्रति किलो ८८ रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि गॅसच्या खरेदी खर्चात झालेली वाढ लक्षात घेता PNGच्या दरातही वाढ करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

CNGच्या दरात का झाली वाढ?
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमतीवर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय निर्देशांकांशी संबंधित गॅसच्या किमतीत झालेली वाढ आणि देशातील CNGची वाढती मागणी यामुळे खरेदी खर्च वाढला आहे. या पार्श्वभूमीवर MGLने CNGच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.


देशात CNGला मोठी मागणी असून ती पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त गॅसचा साठा उपलब्ध करून घ्यावा लागत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम इंधनाच्या किमतीवर होत असल्याचे सांगितले जात आहे.
महागाईचा घरगुती बजेटवर परिणाम
गेल्या काही काळात इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. CNGच्या दरवाढीचा थेट परिणाम वाहनचालकांच्या खर्चावर होऊ शकतो. त्याचबरोबर व्यावसायिक वाहनांच्या वाहतूक खर्चात वाढ झाल्यास त्याचा परिणाम दैनंदिन वापरातील वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या किमतीवरही होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील हालचालींवरही भारतीय तेल कंपन्यांचे लक्ष आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबतही नागरिकांचे लक्ष लागले आहे. CNG-पीएनजीसोबतच इतर वस्तूंच्या किमतीत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.