स्वतःच्या शेतात काम करताना ट्रॅक्टर खाली सापडला शेतकरी, बारामती येथील युवा शेतकऱ्याचे दुःखद निधन..

बारामती : बारामतीमधील बोरकरवाडीतील एक दुःखद घटना घडली आहे. येथे स्वतःच्या शेतात काम करताना ट्रॅक्टर खाली सापडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आकाश सुभाष बोरकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आकाश बोरकर हे त्यांच्या शेतात आज सकाळी उसाची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते. हा छोटा ट्रॅक्टर घेऊन उसाची बांधणी करत असताना अचानक बांधाच्या बाजूला एकेरी चाक होऊन ट्रॅक्टर पलटी झाला. त्यावेळी ट्रॅक्टर खाली आकाश सापडला.

त्याच्या जवळ कोणीही मदतीसाठी नसल्याने त्याला ट्रॅक्टर खालून निघता आले नाही आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचे वय केवळ 22 एवढे होते.
दरम्यान, दुपारी मजुरीसाठी असलेल्या महिलांनी हा प्रकार पाहिला आणि त्यानंतर सगळीकडे माहिती पसरली. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेचा पुढील तपास रुपेश साळुंखे करत आहेत.