मोदींच्या फोटोवरून पुण्यात राजकीय रणकंदन! अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची भाजप नेत्याची मागणी; ‘प्रोटोकॉल’चा मुद्दा ऐरणीवर…

पुणे : मनसे नेते अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील एका घटनेने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वसतिगृह अधिक्षकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी लावलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यात आल्याने आता भाजप आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप नेते नवनाथ बन यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत अमित ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वसतिगृहाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी अधिक्षकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महाराजांच्या फोटोशेजारी मोदींचा फोटो लावण्यास त्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर संबंधित फोटो तेथून हटवण्यात आल्याचे समोर आले.

या प्रकारानंतर भाजप नेते नवनाथ बन यांनी अमित ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवणे हा त्यांचा अपमान असल्याचा आरोप करत अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. शासकीय कार्यालयांमध्ये पंतप्रधानांचा फोटो लावण्यासंदर्भात प्रोटोकॉल असल्याचा दावाही त्यांनी केला.


‘अमित ठाकरे ज्या ठिकाणी गेले ते शासकीय महाविद्यालय आहे. फोटो हटवण्याआधी प्रोटोकॉल समजून घेणे आवश्यक होते,’ असे नवनाथ बन यांनी म्हटले. याचवेळी त्यांनी अमित ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका करत त्यांना प्रोटोकॉलची माहिती नसल्याचा टोला लगावला.
दरम्यान, फोटो हटवल्यानंतर अमित ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणखी एक गुन्हा दाखल झाला तरी हरकत नाही, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे.
अमित ठाकरे यांच्या महाविद्यालय भेटीदरम्यान वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्याही केंद्रस्थानी राहिल्या. वसतिगृहातील जेवण, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत त्यांनी अधिक्षकांना जाब विचारला. विद्यार्थ्यांच्या परिस्थितीशी संबंधित काही छायाचित्रे त्यांनी अधिक्षकांना दाखवत प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले.
याशिवाय अमित ठाकरे यांनी अधिक्षकांच्या टेबलवर कांद्याचे एक रॅकेट ठेवून त्याबाबतही प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित मुद्द्यांवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका त्यांनी घेतली.
एका बाजूला शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून अमित ठाकरे प्रशासनाला धारेवर धरत असताना दुसरीकडे नरेंद्र मोदींच्या फोटोवरून भाजपने त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे पुण्यातील हा फोटोविवाद आता मनसे-भाजपमधील नव्या राजकीय संघर्षाचे कारण ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.