पुण्यात DJचा आवाज थांबणार? फडणवीसांनी दिले संकेत; गणेश मंडळांना थेट आवाहन, म्हणाले…

पुणे : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना पुण्यातील डीजेचा मुद्दा चांगलाच तापला आहे. डीजे, लेझर लाइट्स आणि मोठ्या आवाजाच्या वापरावरून पुण्यात सध्या दोन वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत. काही गणेश मंडळांकडून निर्बंधमुक्त उत्सवाची मागणी होत असताना नागरिकांकडून ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुण्यात महत्त्वाचं आवाहन केलं.
पुण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडत आहे. याच बैठकीत बोलताना फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. डीजेच्या वादात न पडता गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं. पुणेकरांनी आपल्या गणेशोत्सवाची पारंपरिक आणि सांस्कृतिक ओळख जपावी, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.

विशेष म्हणजे, फडणवीसांच्या या भूमिकेआधीच पुण्यात डीजेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. रविवारी डीजेविरोधात पुणेकर रस्त्यावर उतरले होते. त्याचवेळी सत्ताधारी भाजपमध्येही या विषयावर वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी डीजे आणि ध्वनिप्रदूषणाला विरोध केला आहे, तर काहींकडून निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची भूमिका मांडण्यात आली आहे.


पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गणेशोत्सव कायद्याच्या चौकटीत साजरा करण्याची भूमिका मांडली आहे. तसेच प्लाझ्मा, लेझर लाइट आणि प्रेशर हॉर्नच्या वापरावर निर्बंध असावेत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही गणेश मंडळांनी डीजे आणि लेझर बीमचा वापर टाळून नियमांचं पालन करावं, असं स्पष्ट केलं आहे.
दुसरीकडे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सार्वजनिक गणेशोत्सवावर अनावश्यक निर्बंध लादू नयेत, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे डीजेच्या मुद्द्यावर पुणे भाजपमध्येही वेगवेगळे सूर उमटताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेलं सांस्कृतिक गणेशोत्सवाचं आवाहन महत्त्वाचं मानलं जात आहे.
पुणे पोलिसांनी यापूर्वीच गणेशोत्सवासाठी ध्वनिप्रदूषण आणि मोठ्या आवाजाबाबत नियम स्पष्ट केले आहेत. नियमांचं उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना प्रशासनाच्या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पुण्याचा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून त्याला मोठी सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. याच परंपरेचा दाखला देत फडणवीसांनी डीजेच्या वादापेक्षा उत्सवाच्या सांस्कृतिक बाजूला महत्त्व देण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर यंदाचा पुण्यातील गणेशोत्सव डीजेमुक्त होणार का, की नियमांच्या चौकटीत डीजेला परवानगी मिळणार, याबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.