दिल्ली पुन्हा हादरली, धावत्या बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार; 47 किमीपर्यंत भयंकर घडलं, ड्रायव्हर-कंडक्टरला अटक!


नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीशी संबंधित गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. 4 ऑगस्टच्या रात्री ग्रेटर नोएडातील परी चौक ते कश्मीरी गेट असा तब्बल 47 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या स्लीपर बसमध्ये तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी बस चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप यांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील ही विद्यार्थिनी इयत्ता 11वीत शिकते. कुटुंबीयांवर नाराज झाल्यानंतर ती घरातून निघाली होती. नोएडातील चुलत भावाकडे जाण्याच्या प्रयत्नात असताना मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ती ग्रेटर नोएडातील परी चौक येथे उतरली.

रस्त्यावर असताना तिला एक रिकामी स्लीपर बस दिसली. तिने बस थांबवून मदत मागितली. चालक आणि कंडक्टरने तिला नोएडा सेक्टर-63 येथे जाण्याचं सांगत बसमध्ये घेतलं. मात्र, बस पुढे निघाल्यानंतर तिच्यासोबत गैरवर्तन सुरू झाल्याचा आरोप तिने केला आहे.

विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, कंडक्टरने सुरुवातीला तिच्याशी गैरवर्तन केलं. त्यानंतर चालक आणि कंडक्टरने तिच्यावर अत्याचार केला. तिने विरोध केला असता जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचंही तिने पोलिसांना सांगितलं. सुमारे 47 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर कश्मीरी गेट बस अड्ड्याजवळील रिंग रोड परिसरात तिला उतरवण्यात आलं.

घटनेनंतर घाबरलेल्या विद्यार्थिनीने मात्र गप्प न बसता थेट कश्मीरी गेट पोलिसांशी संपर्क साधला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि तिमारपूर परिसरातील एका बस पार्किंगमधून चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप यांना अटक केली. पोलिसांनी संबंधित स्लीपर बसही ताब्यात घेतली असून तिची न्यायवैद्यक तपासणी केली जात आहे.

तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. बसमध्ये आधी बिघाड झाल्यानंतर ती सूरजपूर येथील कार्यशाळेत दुरुस्तीसाठी नेण्यात आली होती. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर चालक आणि कंडक्टर रिकामी बस घेऊन तिमारपूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी परी चौक येथे विद्यार्थिनी बसमध्ये चढली.

स्लीपर बसमध्ये पडदे असल्यामुळे बाहेरून आतील भागात काय सुरू आहे, हे सहज दिसत नसल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान इतर कोणाला या घटनेची माहिती मिळाली नसल्याची शक्यता आहे.

पोलिसांकडून आरोपींची चौकशी, बसमधील पुरावे आणि न्यायवैद्यक अहवालाच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. अल्पवयीन पीडितेची ओळख कायद्यानुसार जाहीर करण्यात आलेली नाही. या घटनेनंतर स्लीपर बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!