रक्षाबंधनला माहेरी जाण्यासाठी महिलेने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव! चुलत दिराला घेतलं सोबत अन्… नवऱ्यालाच बसला धक्का

सातारा : रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत असतानाच साताऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहेरी जाण्यासाठी एका 26 वर्षीय विवाहित महिलेने चक्क स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे.
या प्रकरणाचा अवघ्या चार तासांत छडा लावत पोलिसांनी संपूर्ण सत्य उघड केलं. ही घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील सुरूपखानवाडी गावात घडली. निकिता गलांडे असं या महिलेचं नाव असल्याचं समोर आलं आहे.

सासरच्यांकडून माहेरी जाण्यास विरोध
मिळालेल्या माहितीनुसार, निकिता गलांडे यांना सासरच्या मंडळींकडून माहेरी जाण्याची परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे त्या नाराज होत्या. यानंतर त्यांनी माहेरी जाण्यासाठी वेगळीच योजना आखल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं.


यासाठी त्यांनी आपल्या चुलत दिराची मदत घेतल्याचंही तपासात स्पष्ट झालं आहे. दोघांनी मिळून निकिताच्या अपहरणाचा बनाव रचल्याचा पोलिसांचा दावा आहे.
काळ्या रंगाच्या गाडीची कहाणी
निकिता आणि त्यांचे पती शेतात असताना काळ्या रंगाच्या गाडीतून काही अज्ञात व्यक्ती आल्या आणि त्यांनी निकिताचं अपहरण केलं, अशी माहिती तिच्या पतीकडून पोलिसांना देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला.
चार तासांत सत्य समोर
पोलिसांच्या तपासाला अवघ्या चार तासांत यश आलं. तपासादरम्यान हे अपहरण नसून निकिताने स्वतःच माहेरी जाण्यासाठी रचलेला बनाव असल्याचं समोर आलं.
यानंतर पोलिसांनी निकिताची चौकशी केली असता तिने संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. सासरची मंडळी आपल्याला माहेरी जाऊ देत नसल्यामुळे आपण हा प्रकार केल्याचं तिने सांगितल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणात तिच्या चुलत दिरानेही साथ दिल्याचं तपासातून समोर आलं आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी समोर आलेल्या या अनोख्या घटनेची परिसरात चर्चा सुरू झाली आहे.