३९ बाळांचा श्वास अडकला, पहाटे NICU मध्ये आगीचा कहर! व्हेंटिलेटरच्या स्फोटानंतर धावपळ; ३ नवजातांचा मृत्यू, ६ जण रुग्णालयात

अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे घडलेल्या धक्कादायक दुर्घटनेने खळबळ उडाली. तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशु अतिदक्षता कक्षात पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, कक्षातील व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला. त्यावेळी या कक्षात तब्बल ३९ नवजात बालकांवर उपचार सुरू होते.
आग लागल्याचे लक्षात येताच काही क्षणांतच कक्षात धूर पसरला आणि रुग्णालयात एकच धावपळ सुरू झाली. ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने बचावकार्य सुरू केले. आगीच्या धुरातून नवजात बालकांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत अनेक बाळांना सुरक्षितपणे कक्षाबाहेर हलवले.

मात्र, या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर आणखी सहा बालकांना उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीच्या घटनेनंतर रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.


व्हेंटिलेटरमध्ये स्फोट नेमका कशामुळे?
प्राथमिक माहितीत व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे सांगितले जात असले, तरी उपकरणात नेमका कोणता बिघाड झाला होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्फोटानंतर आग किती वेगाने पसरली, तसेच रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा आणि वैद्यकीय उपकरणांची स्थिती काय होती, याचाही तपास केला जाणार आहे.
या घटनेनंतर नवजात बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः अतिदक्षता कक्षातील व्हेंटिलेटर आणि इतर जीवनरक्षक उपकरणांची देखभाल, विद्युत व्यवस्था तसेच आपत्कालीन बचावयंत्रणेची कार्यक्षमता याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सध्या आगीचे नेमके कारण अधिकृतपणे स्पष्ट झालेले नसून, तपासानंतरच दुर्घटनेमागील संपूर्ण कारण समोर येणार आहे. दरम्यान, या घटनेत मृत्यू झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जखमी बालकांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.