पुणेकरांसाठी मोठी बातमी! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो सप्टेंबरमध्ये धावणार? फडणवीसांनी मोदींना दिलं निमंत्रण

पुणे : पुण्याच्या शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यानची मेट्रो सेवा सुरू होण्याची पुणेकरांना प्रतीक्षा आहे. मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले असून, उद्घाटनासाठी हा मार्ग सज्ज आहे. या मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार असून, रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणातूनही काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो-३चा पहिला टप्पा १३.३ किलोमीटरचा असून, या मार्गावर १२ स्थानके आहेत. मेट्रोचे काम पूर्ण झाले असले तरी उद्घाटनाला विलंब होत असल्याने पुणेकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुणे मेट्रो-३च्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांना निमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्यात मेट्रो-३ पुणेकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम पूर्ण होऊनही उद्घाटनाचा मुहूर्त ठरत नसल्याने पुणेकरांकडून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्याने मेट्रोच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
मात्र, मेट्रो-३ नेमकी कधी सुरू होणार, याबाबत अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे पुणेकरांचे लक्ष आता सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे.