मुलगा गेला अन् सुनेचा सासूच्या जमिनीवर डोळा? ‘एकमेव वारस’ असल्याचे दाखवून 2.64 हेक्टर जमीन नावावर करण्याचा प्रयत्न; यवतमध्ये खळबळ

यवत : मुलाच्या निधनाचे दुःख ताजे असतानाच सासूच्या मालकीच्या लाखो रुपयांच्या शेतजमिनीवर हक्क सांगत ती स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार यवत परिसरात समोर आला आहे. सुनेने स्वतःला मृत पतीची एकमेव वारसदार असल्याचे दर्शवून कथित बनावट प्रतिज्ञापत्र आणि अन्य कागदपत्रांच्या आधारे सासूच्या सुमारे 2.64 हेक्टर जमिनीचा फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात सुनेसह अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पल्लवी उर्फ हंसा जयवंत हरगुडे (वय 57, रा. चेंबूर, मुंबई) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांची सून मयुरी अमित हरगुडे (रा. उदगीर, जि. लातूर) तसेच या प्रकरणात मदत करणाऱ्या अनोळखी व्यक्तींविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पल्लवी हरगुडे यांचा धाकटा मुलगा अॅड. अमित जयवंत हरगुडे यांचे 1 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथे आकस्मिक निधन झाले. अमित आणि मयुरी यांचा विवाह 2021 मध्ये झाला होता. या दाम्पत्याला अपत्य नव्हते.

फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 1992 मध्ये स्वतःच्या स्त्रीधनातून मौजे पाठेठाण, ता. दौंड येथे जमीन खरेदी केली होती. सर्व्हे क्रमांक 214 मधील 1 हेक्टर 84 आर आणि सर्व्हे क्रमांक 225/1 मधील 80 आर अशी एकूण सुमारे 2.64 हेक्टर जमीन त्यांच्या मालकीची असल्याचे खरेदी दस्त आणि महसूल अभिलेखात नमूद आहे.


मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबीय शोकाकुल असताना सुनेने कथितरित्या स्वतःला अमितची एकमेव वारसदार दाखविणारे प्रतिज्ञापत्र तयार केले. त्यानंतर पाठेठाण गावची रहिवासी असल्याचे दर्शवत ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे विविध कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. पोलिस पाटलांकडून वारस चौकशी दाखला तसेच स्थानिक चौकशी अहवालही मिळवून घेतल्याचे फिर्यादींनी म्हटले आहे.
या कागदपत्रांच्या आधारे फेरफार क्रमांक 3994 नुसार संबंधित जमीन सुनेच्या नावावर करण्याची प्रक्रिया करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत आहे. महसूल कार्यालयातून या कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती मिळवून त्या पोलिसांकडे सादर करण्यात आल्या आहेत. मृत पतीच्या वारसाहक्काचा आधार घेत सासूच्या मालकीची जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी खोटी माहिती आणि कथित बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारात अन्य हितसंबंधी व्यक्तींनी मदत केल्याचा संशयही फिर्यादींनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 335 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अंमलदार पोलीस हवालदार वलेकर असून, पुढील तपास मसपोनि गोसावी करीत आहेत. प्रकरणातील कागदपत्रे, फेरफार प्रक्रिया आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत पोलीस तपास करत आहेत.