धर्मेंद्र प्रधानांनंतर आता नितीन गडकरी टार्गेटवर? थेट नागपूरच्या घरासमोर जनआक्रोश मोर्चा; नेमकं कारण काय?


नागपूर : नीट पेपर लीकप्रकरणावरून झालेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आता केंद्र सरकारमधील आणखी एका वरिष्ठ मंत्र्यांविरोधात आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर युवक काँग्रेसने आज ‘जनआक्रोश घेराव’ आंदोलनाची घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा मोर्चा दुपारी १ वाजता महाल परिसरातील चिटणीस पार्क चौकातून सुरू होणार असून, त्यानंतर कार्यकर्ते गडकरी यांच्या निवासस्थानाकडे कूच करणार आहेत. शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी आणि सर्वसामान्यांच्या विविध समस्यांवर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांत इथेनॉल धोरणावरूनही नितीन गडकरी यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत होती. त्याच पार्श्वभूमीवर या आंदोलनाकडे विशेष लक्ष लागले आहे.

आंदोलनासाठी युवक काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या पोस्टरमध्ये “धर्मेंद्र प्रधान तो झांकी है… नितीनजी अभी बाकी है!” असा मजकूर देत केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. तसेच “प्रश्न आमचे – उत्तर तुमचे” आणि “आश्वासन नाही, हिशेब द्या” अशा घोषणांद्वारे सरकारकडे उत्तरांची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी गडकरी यांच्या निवासस्थान परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निवासस्थानापर्यंत पोहोचू दिले जाणार की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!