NEET-PG 2026 साठी केंद्राचा मोठा निर्णय! घराजवळ परीक्षा केंद्र, एकाच शिफ्टमध्ये परीक्षा; उमेदवारांना मिळणार मोठा दिलासा


नवी दिल्ली : देशभरातील लाखो वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश इच्छुकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या NEET-PG 2026 परीक्षेपूर्वी केंद्र सरकारने परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल जाहीर केले असून, यामुळे उमेदवारांचा ताण कमी होण्यासोबतच परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि न्याय्य पद्धतीने पार पडणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या नव्या नियमांना मंजुरी दिली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी संबंधित यंत्रणांना कोणतीही त्रुटी न राहता परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यंदाचा सर्वात मोठा बदल म्हणजे NEET-PG परीक्षा आता संपूर्ण देशभरात एकाच शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. मागील काही वर्षांत परीक्षा दोन सत्रांत होत असल्याने प्रश्नपत्रिकांच्या कठीणतेबाबत वाद निर्माण होत होते. मात्र यावेळी सर्व उमेदवार एकाच प्रश्नपत्रिकेवर परीक्षा देणार असल्याने मूल्यांकनात समानता आणि पारदर्शकता राखली जाईल.

परीक्षा केंद्र वाटपाच्या प्रक्रियेतही मोठा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केंद्र वाटप होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यात परीक्षा द्यावी लागत होती. आता उमेदवारांना तीन पसंतीची राज्ये निवडण्याची संधी दिली जाणार असून, स्वतःच्या राज्याला प्रथम पसंती देणे आवश्यक असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळ किंवा जवळच्या शहरात परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता वाढणार आहे.

याशिवाय परीक्षा शहराची माहिती परीक्षेच्या सुमारे तीन आठवडे आधी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे प्रवास, निवास आणि इतर तयारीसाठी उमेदवारांना पुरेसा वेळ मिळेल. याआधी परीक्षा केंद्राची माहिती उशिरा मिळत असल्याने अनेकांना आर्थिक आणि मानसिक ताण सहन करावा लागत होता.

परीक्षेच्या स्वरूपातही बदल करण्यात आला आहे. यंदा प्रश्नांची संख्या 200 वरून 180 करण्यात आली असून, परीक्षा कालावधी 210 मिनिटे कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना तुलनेने अधिक वेळ मिळणार असून, घाईगडबडीत उत्तर देण्याची गरज भासणार नाही.

यंदा NEET-PG 2026 साठी देशभरातून 2 लाख 73 हजार 183 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत 12.5 टक्क्यांनी अधिक असल्याने परीक्षा व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे.

परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्यात आली आहे. अर्जापासून परीक्षा संपेपर्यंत आधार-आधारित पडताळणी केली जाणार असून, आवश्यक असल्यास आयरीस बायोमेट्रिकचा वापर केला जाईल. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय एन्क्रिप्शन, नियंत्रित डिजिटल डिक्रिप्शन, सुरक्षित ऑफलाइन प्रणाली, सीसीटीव्ही देखरेख, सिग्नल जॅमर, बायोमेट्रिक पडताळणी आणि संगणकांचे सुरक्षित वाटप अशा अत्याधुनिक उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. गैरप्रकार किंवा बनावट उमेदवारांबाबत तक्रार करण्यासाठी NBEMS ने स्वतंत्र ई-मेल यंत्रणाही सुरू केली आहे.

30 ऑगस्ट रोजी होणारी ही परीक्षा देशातील सुमारे 340 शहरांमधील 1,300 हून अधिक केंद्रांवर एकाच शिफ्टमध्ये होणार असून, त्यासाठी 60 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. परीक्षा अधिक निष्पक्ष, सुरक्षित आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी करण्यात आलेले हे बदल आगामी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!