गॅस सिलेंडरच्या दरात मोठा बदल! 200 रुपयांनी भाव कमी; आता कितीला मिळणार? जाणून घ्या नवे दर

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 1 ऑगस्टपासून 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात सुमारे 200 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, कॅफे आणि कॅटरिंग व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवीन दरानुसार, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 202 रुपयांची कपात झाली असून आता त्याची किंमत 2,728 रुपये झाली आहे. कोलकात्यात 209 रुपयांची कपात होऊन सिलेंडर 2,872.50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2,691 रुपये, तर पटणा येथे 3,018 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. चेन्नईतही जवळपास 200 रुपयांचा दिलासा मिळाला आहे.

जुलै महिन्यातही तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 183 रुपयांची कपात केली होती. त्यामुळे केवळ दोन महिन्यांत दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर 385.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. वाढत्या इंधन खर्चामुळे अडचणीत आलेल्या व्यावसायिकांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.


गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय घडामोडी, विशेषतः पश्चिम आशियातील तणावामुळे गॅसच्या किमती वाढल्या होत्या. त्याचा मोठा फटका हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि कॅटरिंग व्यवसायाला बसला होता. काही ठिकाणी वाढलेल्या खर्चामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत सलग दुसऱ्या महिन्यात झालेली दरकपात व्यावसायिकांसाठी सकारात्मक ठरली आहे.
मात्र, घरगुती ग्राहकांना यावेळी कोणताही दिलासा मिळालेला नाही. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून जुन्याच दराने सिलेंडर उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांना स्वस्त गॅसची प्रतीक्षा कायम राहिली आहे.
कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
हॉटेल आणि रेस्टॉरंट चालक
ढाबा व्यावसायिक
कॅफे मालक
कॅटरिंग सेवा पुरवठादार
चहा व नाश्ता केंद्र चालक
इतर व्यावसायिक LPG सिलेंडर वापरणारे उद्योजक
सलग दोन महिन्यांच्या दरकपातीमुळे या व्यावसायिकांचा गॅसवरील खर्च कमी होणार असून त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या व्यवसायावर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.