अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग जाणून घ्या…

पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (1 ऑगस्ट) पुण्यात विविध सामाजिक संघटना, स्थानिक मंडळे आणि राजकीय पक्षांकडून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सारसबाग परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे वाहतूक शाखेने विशेष वाहतूक नियोजन जाहीर केले आहे.
वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजल्यापासून आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार असून अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता काही प्रमुख मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले की, जेधे चौक ते सारसबाग हा मार्ग बंद राहणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. सिंहगड रोड, स्वारगेट, कात्रज, वेगा सेंटर, सावरकर चौक आणि दांडेकर पूल परिसरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.


तसेच वेगा सेंटर–सारसबाग ग्रेड सेपरेटर, जेधे चौक वाय-जंक्शन (फ्लायओव्हर) आणि सावरकर चौक–पुरम चौक मार्गावरही वाहतुकीवर निर्बंध असणार आहेत. परिस्थितीनुसार काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात येणार असून काही रस्त्यांवर तात्पुरती दुहेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
याशिवाय, मित्रमंडळ चौक मार्गे येणाऱ्या अनुयायांनी दुचाकी वाहने पाटील प्लाझा येथे पार्क करावीत, असे आवाहनही वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पुणे वाहतूक शाखेने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि गर्दीच्या वेळेत शक्यतो संबंधित परिसर टाळण्याचे आवाहन केले आहे.