झुडपातील पोत्याने उघड केला थरार! मित्राच्या संशयातून तरुणाचा जीव घेतला; पत्नीनेच दिली मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात साथ…
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात झुडपामध्ये पोत्यात भरलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाच्या गूढाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा करत दुहेरी भूमिका बजावणाऱ्या दाम्पत्याला अटक केली आहे. सुरुवातीला अज्ञात मृतदेह म्हणून समोर आलेल्या या घटनेमागे अनैतिक संबंधाच्या संशयातून घडलेले थरारक हत्याकांड दडले असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
२४ ते २६ जुलैदरम्यान करंजेनगर परिसरातील मोकळ्या मैदानाशेजारील झुडपात पोत्यात भरलेला एका तरुणाचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला होता. माहिती मिळताच शिक्रापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी घटनास्थळावरील प्रत्येक पुरावा बारकाईने गोळा केला. त्यानंतर सोशल मीडियावर मृत तरुणाचे छायाचित्र प्रसारित करण्यात आले, तसेच गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय करून बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासण्यात आली.

या तपासातून मृत तरुणाची ओळख गौरव उर्फ अक्षय अशोक वायकर (वय २४, मूळ रा. थेऊर) अशी पटली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या शेवटच्या हालचालींचा तपास सुरू केला. गौरव हा करंजेनगर येथे मुकेश विठ्ठल सोनवणे आणि त्याची पत्नी जान्हवी पाटोळे यांच्यासोबत राहत असल्याचे समोर आले. परिसरातील नागरिक आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली असता, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली.


या धाग्याच्या आधारे पोलिसांनी मुकेश आणि जान्हवी यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे, घटनाक्रम आणि इतर माहिती समोर ठेवल्यानंतर दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पत्नी आणि गौरव यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय मुकेश सोनवणे याला होता. याच संशयातून त्याने गौरवचा गळा दाबून खून केला. गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून मृतदेह पोत्यात भरून निर्जन झुडपात फेकण्याचा कट रचण्यात आला. या संपूर्ण प्रकारात पत्नी जान्हवी हिनेही पतीला मदत केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी मृत गौरवची आई कांचन अशोक वायकर यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, हत्या नेमकी कुठे करण्यात आली, मृतदेह किती वेळ घरात ठेवण्यात आला होता, पुरावे नष्ट करण्यासाठी आणखी कोणती साधने वापरण्यात आली का, तसेच या गुन्ह्यामागे इतर कोणते कारण होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
बेवारस मृतदेहापासून सुरू झालेला तपास काही तासांत थेट आरोपींपर्यंत पोहोचल्याने शिक्रापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाचे कौतुक होत आहे. या प्रकरणात पुढील तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.