मंत्री विखे पाटील यांची मोठी घोषणा! आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनाची वेळच येणार नाही?


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे. मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भूमिका मांडत, “मनोज जरांगे यांना आंदोलनाची वेळच येणार नाही,” असा दावा केला.

मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका करत 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

विखे पाटील म्हणाले, सरकारने मराठा समाजासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू करण्यात आली असून आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या 32 जणांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच महामंडळ आणि एमआयडीसीमध्येही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

याशिवाय, सारथी संस्थेमार्फत यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी जागा 400 पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी एसओपी तयार करण्यात आली असून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला हेल्पलाइन सुरू करण्याच्या आणि दर सोमवारी आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जात प्रमाणपत्रासंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठीही प्रशासनाला निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीवर टीका करताना विखे पाटील म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळात काही निर्णय रद्द झाल्यामुळे मराठा समाजाचे नुकसान झाले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पुन्हा अनेक निर्णय घेतले असून शिंदे समितीने 58 लाखांहून अधिक नोंदी शोधण्याचे काम केले आहे. समितीला 2027 पर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे.

दरम्यान, अभिजीत दीपके यांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. दीपके यांनी धमकी दिल्याचा आरोप केला असेल, तर संबंधितांची नावे जाहीर करावीत, असे आवाहन करत त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण केल्याचा आरोप विरोधकांवर केला. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असून आवश्यक अडचणी दूर करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!