LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 ऑगस्टपासून सिलेंडर वितरणाचे नियम बदलणार; जाणून घ्या नवे नियम

मुंबई : देशभरातील एलपीजी ग्राहकांसाठी 1 ऑगस्ट 2026 पासून काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅसच्या ग्राहकांना गॅस सिलेंडरच्या दरांबरोबरच e-KYC, घरपोच वितरण आणि डिलिव्हरी प्रमाणीकरणाच्या नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. या बदलांचा परिणाम कोट्यवधी ग्राहकांवर होणार असून वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कडक करण्यात येणार आहे.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार घरगुती (14.2 किलो) आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर करतात. त्यामुळे 1 ऑगस्टपासून सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांसह हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावरही होऊ शकतो.

याशिवाय e-KYC प्रक्रियेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. गॅसचा काळाबाजार आणि गैरवापर रोखण्यासाठी इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅसच्या ग्राहकांनी e-KYC पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. ज्या ग्राहकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल, त्यांना गॅस सबसिडी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये गॅस कनेक्शनवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपन्यांनी अधिकृत मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन वापरून e-KYC पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.


तसेच, 1 ऑगस्टपासून घरपोच गॅस सिलेंडर वितरणासाठी OTP आधारित डिलिव्हरी ऑथेंटिकेशन अधिक कठोर करण्यात येणार आहे. सिलेंडर बुक केल्यानंतर ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जाईल. हा OTP डिलिव्हरी कर्मचाऱ्याला दाखवल्यानंतरच सिलेंडरची डिलिव्हरी केली जाणार आहे.
दरम्यान, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरही अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा कोणाला आणि कुठे करण्यात आला, याची नोंद संबंधित गॅस एजन्सींना तेल कंपन्यांकडे सादर करावी लागणार आहे. एलपीजी वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढवणे आणि काळाबाजाराला आळा घालणे, हा या नव्या नियमांचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.