MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! प्रश्नपत्रिकेसाठी 12 लाखांचा सौदा? रोहित पवारांचा दावा


मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणात गंभीर आरोप केले. प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी 12 लाख रुपयांचा सौदा झाल्याचा दावा त्यांनी केला.

रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी संबंधित उमेदवाराकडून 5 लाख रुपये अॅडव्हान्स घेण्यात आले होते, तर उर्वरित 7 लाख रुपये नंतर देण्याचे ठरले होते. या कथित व्यवहाराचा संबंध बार्शीशी असल्याचाही दावा त्यांनी केला. मात्र, या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी परीक्षेच्या कट-ऑफवरही प्रश्न उपस्थित केले. कट-ऑफ 105 गुणांचा असताना 103 गुण मिळालेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी कसे बोलावले गेले? असा सवाल करत, त्यामागे कोणाचा दबाव होता का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

रोहित पवार यांनी सांगितले की, एफडीए चांगले काम करत असले तरी पैसे देऊन एखादी व्यक्ती औषध निरीक्षक बनली, तर ती पुढे भ्रष्टाचार करून ते पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांकडून सामान्य नागरिकांना न्याय मिळेल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पत्रकार परिषदेत त्यांनी नंदुरबारमधील एका नायब तहसीलदाराच्या दोन मुलांच्या निकालाबाबतही संशय व्यक्त केला. त्यांच्या माहितीनुसार, दोघांनीही ही परीक्षा दिली होती. मुलाला 149 गुणांसह 13वा, तर मुलीला 148 गुणांसह 16वा क्रमांक मिळाल्याचा उल्लेख करत, हा केवळ योगायोग आहे की यामागे काही वेगळे कारण आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, 22 मार्च रोजी झालेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजे 20 मार्चलाच काही प्रश्न WhatsApp वर पाठवण्यात आले होते. संशय येऊ नये म्हणून उमेदवारांना 10 प्रश्न जाणीवपूर्वक चुकीचे सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्याचाही त्यांनी दावा केला. या कथित व्यवहाराशी संबंधित WhatsApp चॅटही समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच एका उमेदवाराने 78 प्रश्न आधीच मिळाले होते, तर उर्वरित प्रश्न अंदाजाने सोडवले, असा उल्लेख चॅटमध्ये असल्याचा दावाही त्यांनी केला. NEET पेपरफुटीप्रमाणेच MPSC परीक्षेतही प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या व्यक्तींचा सहभाग होता का, याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करत या संपूर्ण प्रकरणामागील सूत्रधारांचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!