थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना

उरुळीकांचन: अष्टविनायक मार्ग असलेल्या थेऊर उड्डाणपुलाला काही दिवसांपूर्वी मोठा खड्डा पडला होता. त्याअनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या संरक्षण अनुषंगीय काम सुरू केले आहे. पुलासह कामाची, शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाचा दर्जा, कामाची गती तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. काम उच्च दर्जाचे, सुरक्षित आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात यावे, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत .

यावेळी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शशिकांत गायकवाड, माजी सरपंच नंदू पाटील काळभोर यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्थानिक नागरिकांनी उड्डाणपूल दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून, सुरक्षित वाहतूक सुरू करण्याची मागणी केली. यावर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन कामात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, तसेच काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्याचे सांगितले.
सध्याचे पुलाचे सुरू असलेले काम, हे पुलाला गेलेल्या तड्यांना आधार देण्यासाठीचे भिंतीचे काम सुरू आहे. पाऊस हंगाम संपल्यावर दुसऱ्या टप्प्यातील मुख्य पुलाचे काम, 3/4 महिन्यानंतर सुरू होईल. यामध्ये पुलाचा थेऊरकडील बाजूचा तडा गेलेला भाग काढून, नव्याने केला जाणार आहे. त्यावेळी काही काळ हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे सभापती युवराज काकडे यांनी सांगितले.