ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मोठा निर्णय! 24 जुलैची प्रारूप मतदार यादी स्थगित, नवे वेळापत्रक लवकरच


पुणे : राज्यातील मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे 24 जुलै रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी आता जाहीर केली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकोणी यांनी याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. भारत निवडणूक आयोगाकडून सध्या विधानसभा मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) सुरू असल्याने ग्रामपंचायत मतदार यादी कार्यक्रमाला मुदतवाढ देण्याची मागणी अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती.

मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र) यांनीही विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरच ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राबवावा, अशी शिफारस केली होती. तसेच आयोगाच्या संगणकीय प्रणालीत राज्यातील सुमारे 15 हजार ग्रामपंचायतींपैकी केवळ काही ग्रामपंचायतींच्याच प्रारूप याद्या तयार झाल्याचे निदर्शनास आले.

यापूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 24 जुलैला प्रारूप मतदार यादी, 29 जुलैपर्यंत हरकती, तर 4 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असून, सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!