लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! पडताळणीनंतर 80 लाखांहून अधिक महिला अपात्र; अंतिम लाभार्थींची यादी जाहीर

पुणे : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची ई-केवायसी आणि लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता राज्यातील 1 कोटी 66 लाख 28 हजार 48 महिला अंतिमतः पात्र ठरल्या आहेत. या सर्व पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचे अनुदान जमा करण्यात आले आहे.
योजना सुरू झाल्यानंतर राज्यभरातून सुमारे 2 कोटी 47 लाख अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, कागदपत्रे आणि पात्रतेची सखोल तपासणी केल्यानंतर 80 लाख 71 हजार 952 महिला अपात्र ठरल्या. पडताळणीदरम्यान अनेक महिलांनी चुकून स्वतःची नोंद ‘शासकीय कर्मचारी’ अशी केल्याने त्या सुरुवातीला अपात्र ठरल्या होत्या.

सरकारने ही चूक दुरुस्त करण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली. त्यानंतर सुमारे 20 लाख महिलांनी माहिती दुरुस्त करून पुन्हा पात्रता मिळवली, तर केवळ 4 लाख महिला निकषांमध्ये न बसल्याने अपात्र ठरल्या.


पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सरकारचा या योजनेवरील खर्च कमी झाला असून, महिन्याला सुमारे 2,459 कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे सरकारची वर्षाकाठी सुमारे 12 हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, योजनेची पारदर्शकता वाढवण्यासाठी लाभार्थ्यांची वेळोवेळी पडताळणी केली जाईल. तसेच, 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित महिला योजनेसाठी अपात्र ठरतील, अशी तरतूदही नियमांमध्ये आहे.