50 हजारांची लाच घेताना महावितरणचा सहायक अभियंता ACBच्या जाळ्यात; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

नवी मुंबई : शासकीय कामासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. तळोजा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) कार्यालयातील रोहित मोरे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या ‘पी. एन. इलेक्ट्रिकल’ कंपनीच्या कामासाठी आवश्यक असलेला फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करून देण्यासाठी रोहित मोरे यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. नियमांनुसार होणाऱ्या कामासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याने तक्रारदाराने नवी मुंबई ACBकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACBच्या पथकाने तळोजा येथील महावितरण कार्यालय परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारत असतानाच ACBने रोहित मोरे यांना रंगेहात पकडले.


या प्रकरणी आरोपी रोहित मोरे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का तसेच यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारे लाच घेतली होती का, याचा तपास नवी मुंबई ACBकडून सुरू आहे.