ऑनलाइन नाही? तरीही UPI पेमेंट होणार! इंटरनेटशिवाय ‘Tap-to-Pay’ची नवी सुविधा; 2 हजारांपर्यंत व्यवहार शक्य

मुंबई : डिजिटल व्यवहारांची सवय लागलेल्या देशात आता इंटरनेट नसतानाही UPI पेमेंट करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. शाळेची फी, किराणा, भाजीपाला, प्रवास किंवा दैनंदिन खरेदीसाठी UPI वर अवलंबून असलेल्या ग्राहकांसाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) एक मोठे तांत्रिक अपडेट आणण्याच्या तयारीत आहे. ‘Tap-to-Pay’ या नव्या सुविधेमुळे इंटरनेट कनेक्शन नसतानाही काही सेकंदांत UPI व्यवहार करता येणार आहेत.
या नव्या सुविधेसाठी NFC (Near Field Communication) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी वापरकर्त्यांना इंटरनेट उपलब्ध असताना UPI Lite Wallet मध्ये आधीच रक्कम जमा करून ठेवावी लागेल. त्यानंतर इंटरनेट नसलेल्या ठिकाणी मोबाईल फक्त PoS (Point of Sale) मशीनला टॅप करून 2,000 रुपयांपर्यंतचे पेमेंट करता येईल. विशेष म्हणजे या व्यवहारासाठी UPI PIN टाकण्याचीही गरज भासणार नाही, त्यामुळे व्यवहार अधिक जलद आणि सोपे होतील.

ही सुविधा विशेषतः इंटरनेटची समस्या असलेल्या भागांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. मेट्रो प्रवास, विमानतळ, दुर्गम ग्रामीण भाग, नेटवर्क कमी असलेली ठिकाणे किंवा गर्दीमुळे इंटरनेट मंदावलेल्या परिसरातही ग्राहक सहज पेमेंट करू शकतील. त्यामुळे डिजिटल व्यवहारांची गती आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सुरक्षेच्या दृष्टीनेही या सुविधेत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. व्यवहाराच्या वेळी PoS मशीन पेमेंटची माहिती सुरक्षित स्वरूपात जतन करेल. इंटरनेट उपलब्ध झाल्यानंतर ही माहिती पुढील पडताळणीसाठी संबंधित प्रणालीकडे पाठवली जाईल. त्यामुळे ऑफलाइन व्यवहारही सुरक्षित आणि विश्वासार्ह राहतील.


ही सुविधा सुरू करण्यासाठी PoS टर्मिनल उत्पादक कंपन्यांना NPCI कडून आवश्यक प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. त्याचबरोबर विविध बँका तसेच Google Pay, PhonePe, BHIM यांसारखे लोकप्रिय UPI अॅप्सही त्यांच्या प्लॅटफॉर्मवर हे नवीन फीचर उपलब्ध करून देण्यासाठी तांत्रिक तयारी करत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, इंटरनेटवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या डिजिटल पेमेंट प्रणालीला हा पर्याय अधिक सक्षम बनवेल. विशेषतः आपत्कालीन परिस्थिती, नेटवर्क नसलेले भाग किंवा कमी कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणीही ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी अडचण येणार नाही. NPCI कडून या सुविधेच्या अंमलबजावणीबाबत अंतिम प्रक्रिया सुरू असून, लवकरच देशभरातील UPI वापरकर्त्यांना इंटरनेटशिवाय पेमेंट करण्याचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे.
