‘मी बॉस बोलतोय…’ मेसेज आला अन् कंपनीच्या खात्यातून 2.36 कोटी गायब; कोल्हापुरात खळबळ


कोल्हापूर : “मी बॉस बोलतोय… तातडीने पैसे ट्रान्सफर करा,” असा WhatsApp संदेश पाठवून कोल्हापुरातील एका कंपनीची 2 कोटी 36 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा छडा लावत कोल्हापूर सायबर पोलिसांनी गुजरातमधून पाच आरोपींना अटक केली आहे.

गोकुळ शिरगाव येथील युनिटी मोटर्स कंपनीच्या व्यवस्थापकाला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने WhatsApp संदेश आला. नवीन करारासाठी तातडीने पैसे पाठवण्याच्या सूचनेवर विश्वास ठेवून व्यवस्थापकाने विविध बँक खात्यांमध्ये रक्कम हस्तांतरित केली. काही वेळातच कंपनीच्या खात्यातून 2.36 कोटी रुपये वळते झाल्याचे समोर आले.

फसवणुकीची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलीस आणि सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. डिजिटल ट्रेल, बँक व्यवहार आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास करत आरोपींचा माग गुजरातमधील अहमदाबादपर्यंत पोहोचला.

विशेष पथकाने राजेश उर्फ डीके गुरनानी, भावीन खांडोरा, देव त्रिवेदी, जतीन पाल आणि अर्पित पांडे या पाच आरोपींना अटक केली. तपासात फसवणुकीतील सुमारे 32 लाख रुपयांची विल्हेवाट लावल्याचेही उघड झाले आहे. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईनंतर सायबर पोलिसांनी नागरिक आणि कंपन्यांना आवाहन केले आहे की, मोठी आर्थिक रक्कम हस्तांतरित करण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष फोन किंवा समक्ष संपर्क करून खात्री करावी. ‘Boss Scam’च्या माध्यमातून सायबर गुन्हेगार कंपन्यांना लक्ष्य करत असल्याने विशेष सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!